ऐन तारुण्यात वाढतोय हृदयविकाराचा धोका

वयाच्या अवघ्या २०-२५व्या वर्षी तरुणांना हृदयविकाराचा झटका येत आहे. त्याचबरोबर महिलांतही हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात अलीकडील काळात वाढ झाली आहे. तरुणांची बदललेली जीवनशैली, कार्यरत असलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वाढलेली जीवघेणी स्पर्धा, खाद्यपदार्थांत झालेला बदल याचा एकत्रित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यातूनच हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

शहरातील क्रीडांगणे कमी झाली आहेत. क्रीडांगणे नसल्याने मुलांच्या खेळण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मैदानावरील खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे युवकांचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर वाया जात आहे. युवक तासन्तास मोबाइल, संगणक, टीव्ही आणि व्हिडिओ गेम खेळत बसलेले दिसून येतात. खाण्याच्या पदार्थांत झालेला बदलही यामागील एक कारण ठरत आहे. दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात फास्ट फूडचा समावेश होत आहे.

मुलांवर शालेय जीवनापासून अपेक्षांचे मोठे ओझे लादले जात आहे. मुलांकडून पालकांच्या अपेक्षांत मोठी वाढ झाली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, अपेक्षित यश मिळविण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा, आहारात झालेला बदल, नोकरी – व्यवसायातील अस्थिरता याचाही परिणाम आरोग्यावर होत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त तरुणांना घरापासून, कुटुंबांपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. यातूनच हृदयरोग विकारांना आमंत्रण मिळत आहे.

ग्रामीण भागातही आता हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहरीकरणाचा परिणाम ग्रामीण भागातील जीवनमानावरही झाला आहे. यांत्रिकीकरणामुळे कष्टाची कामे तुलनेत पूर्वीपेक्षा खूप कमी झाली आहेत. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.

जागतिकीकरणामुळे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याकडे गुंतवणूक केली. त्यात अनेकांना रोजगार मिळाला. परंतु, त्या कंपन्यांच्या वेळेनुसार काम करावे लागत असल्याने कामाच्या वेळेत खूप बदल होत आहे. खासगी कंपन्यांत टार्गेटनुसार काम करावे लागत आहे. (प्रतिनिधी)तरुणांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. आहारात फास्ट फूड,जंक फूडचे प्रमाण वाढले आहे. शालेय जीवनापासून व्यायाम करणे आवश्यक आहे. दैनंदिन आहार उत्तम असणे आवश्यक आहे. मैदानी खेळ कमी झाले आहेत. त्या तुलनेत बैठ्या खेळांत वाढ आली आहे. लहान मुलांतील स्थूलतेचे प्रमाण शालेय जीवनापासूनच कमी करणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *