अर्थसंकल्पाच्या सज्जतेला हलव्याच्या ‘गोडी’ने सुरुवात!

अर्थमंत्रालयाचे नवी दिल्लीतील मुख्यालय नॉर्थ ब्लॉकमध्ये दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या सप्ताहात गरमागरम हलव्याचा न चुकता दरवळ होतोच. अर्थसंकल्पाच्या तयारीचा एक भाग म्हणून त्याच्या प्रत्यक्ष छपाईच्या कामाला पारंपरिक हलव्याचा आस्वाद घेत सुरुवात होते. शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी नॉर्थ ब्लॉकमधील उच्चाधिकारी व कर्मचारी यांच्यासह या सोहळ्यात सहभाग केला. परंपरेप्रमाणे एका मोठय़ा कढईत गोड हलवा (गाजराचा!) शिजवून त्याच्या सह-आस्वादाची ही प्रथा म्हणजे अर्थसंकल्पाचे पावित्र्य आणि गोपनीयतेच्या सांभाळाचेही प्रतीक आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत, त्याच्या छपाईच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपूर्णपणे तोडण्यात येते. घरी फोन, ई-मेल अथवा अन्य कोणत्याही मार्गातून संपर्क होणार नाही याची काळजी घेतली जाते. शुक्रवारच्या या सोहळ्याला अर्थसंकल्पाला आकार देण्यास हातभार असणारे अर्थ सचिव रतन वट्टल, महसूल सचिव हसमुख अधिया, अर्थ व्यवहार सचिव आणि अन्य अधिकारीही सामील झाले होते. अर्थ मंत्रालयातील केवळ काही मोजक्या उच्चाधिकारी व मंत्रिगणांना वगळता, सर्वाना २९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत नॉर्थ ब्लॉकमध्ये अहोरात्र मुक्कामाची या औपचारिक सोहळ्याने वर्दी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *