चहाची टपरी चालवून चार्टड अकाउटंट (सी. ए.) ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथ गिरम याची राज्य शासनाच्या कमवा व शिका योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे रविवारी केली. त्यामुळे आजवर स्वत:च्या कमाईवर शिक्षण पूर्ण करणारा सोमनाथ आता इतर विद्यार्थ्यांनाही धडे देणार आहे.
डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस – रुबिकाच्या पदवी प्रदान समारंभात तावडे यांच्या हस्ते सोमनाथचा सत्कार करण्यात आला. ‘आज कल चाय वालों को अच्छे दिन है…’ असे सांगत तावडे म्हणाले, चहा विकणारे पंतप्रधान झाले आहेत आणि सोमनाथ चहा विकून सी.ए. झाला आहे.
सोमनाथ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देईल. त्यामुळे त्याला शासनाच्या ‘कमवा व शिका’ योजनेचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर केले जात आहे. डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस – रुबिका सारख्या संस्थांमुळे पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर पडली आहे,असे तावडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)सोमनाथ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सांगवी गावचा. जिरायती शेती. पाऊसच पडत नसल्याने पिकही नाही. त्यामुळे आई-वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत घरचा गाडा चालवतात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे अशक्यच. दररोज ३२ किमी अंतर सायकलवर कापत जेऊर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
उच्चपदवीच्या शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर घरातून पैसे येणे शक्य नव्हते. म्हणून त्याने पेरूगेट पोलीस चौकीच्या परिसरात चहाची टपरी टाकली. त्याच काळात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. एक चहा विक्रेता पंतप्रधान बनू शकतो तर आपण का नाही… या विचाराने प्रेरित होऊन दिवसभर चहा विकून आणि रात्रभर अभ्यास करून सोमनाथने सीएची अंतिम परीक्षा दिली आणि त्यात तो उत्तीर्ण झाला.