बदलती जीवनशैली, वाढते वय यामुळे वंधत्वाची प्रकरणे वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात १० टक्के तर मुंबईत नव्याने विवाह झालेल्या ५० टक्के दाम्पत्यांमध्ये ही समस्या प्रकर्षाने दिसून येते. वंधत्वाची समस्या आता समाजात झपाटय़ाने पाय रोवू लागल्याने वास्तवाकडे पाहण्याची लोकांची दृष्टीच हरवत चालली आहे.
नैसर्गिक गर्भधारणा न झाल्यास आता विशिष्ट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भधारणा होऊ शकते. ‘एक तरी मूल पाहिजे’..अशी आर्त इच्छा असल्याने अनेक दाम्पत्य खासगी रुग्णालयांत लाखो रुपये खर्च करतात. मात्र, आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असणा-या गरीब व्यक्ती उपचाराचा हा खर्च उचलू शकत नाहीत. पैशाअभावी कोणीही दाम्पत्य आई-वडील होणा-या सुखापासून वंचित राहू नये म्हणून मुंबईतील वाडिया रुग्णालयात ‘टेस्ट टय़ूब बेबी’ सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे बाळाच्या प्रतीक्षेत असलेल्या जोडप्यांना नवा आशेचा किरण मिळणार आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात बैठे राहणीमान, उशिरा लग्न व उशिरा मुलांचा विचार अशा विविध कारणांमुळे सध्या वंधत्वाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. परिणामी पस्तीशी जवळ आली की पाळणा हलत नाही. एक वेळ अशी येते की आता बाळ पाहिजे, अशी स्थिती असते. अशावेळी संबंधित दाम्पत्य डॉक्टरांकडे जातात. गर्भधारणेबाबत लोकांचा सल्ला घेतात. डॉक्टरही त्यांना सर्व बाजू समजावून सांगतात.
तसेच दोघांचीही तपासणी करण्यात येते. स्त्रीच्या बाबतीत महत्त्वाच्या तीन गोष्टी तपासल्या जातात. यात गर्भाशय निरोगी असणे, बीजनलिका मोकळ्या असणे आणि बीजंडकोशातून दर महिन्याला परिपक्व स्त्री बीज निर्माण होणे याचा समावेश आहे. अनेकदा विविध कारणास्तव जोडप्यांना मूल होण्यास अडचणी निर्माण होतात.
या अडचणींवर मात करण्यासाठी आता ‘टेस्ट टय़ूब बेबी’ हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. या प्रक्रियेत हार्मोन्सच्या इंजेक्शनच्या सहाय्याने उच्च प्रतीची स्त्री बिजे निर्माण केली जातात. ही स्त्रीबिजे परिपक्व झाल्यानंतर ओव्हम पिकअप तंत्राद्वारे शरीराबाहेर काढून आयव्हीएफ लॅबोरेटरीत एका काचपात्रात ठेवली जातात. व पतीचे शुक्रपेशी इंजेक्शन सुईच्या सहाय्याने ईक्सी तंत्रज्ञानाद्वारे या स्त्रीबिजामध्ये सोडून याचे फलण मानवी शरीराबाहेर घडवून पाच दिवसांपर्यंत लॅबोरेटरीमध्ये केली जाते.
लॅबोरेटरीमध्ये निर्माण केलेल्या व दोन ते पाच दिवसांपर्यंत वाढ झालेल्या या गर्भाचे रोपण गर्भाशय मुखाच्या मार्गे पुन्हा गर्भाशयात गर्भाशय ट्रान्सफर या तंत्राद्वारे केले जाते. यानंतर या गर्भाची त्या स्त्रीच्या गर्भाशयात नऊ महिन्यांपर्यंत नैसर्गिकरीत्या वाढ होऊन बाळाचा जन्म होतो.
विशेषत: शहरी भागात राहणा-या लोकांना या उपचारप्रक्रियेबाबत थोडय़ाफार प्रमाणात माहिती आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना याची माहिती नाही. पण, सध्या वंधत्व ही समस्या समाजात मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. ही समस्या फक्त एका विशिष्ट वर्गाला भेडसावते असे नाही तर ही समस्या श्रीमंत व गरीब समाजातील सर्व स्तरांमधील दाम्पत्यांमध्ये पाहायला मिळते.
लग्नानंतर एक तरी मूल पाहिजे, अशी अनेकांची इच्छा असते. व ती साहजिकच आहे. पण, ही आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त उपचारप्रक्रिया फक्त खासगी रुग्णालयांत उपलब्ध होती. या उपचारासाठी लागणारा खर्च लाखोंच्या घरात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हा खर्च परवडय़ाजोगा नसतो. त्यामुळे, अनेक जोडपी अपत्याशिवाय जगताना दिसतात. या पार्श्वभूमीवर वाडिया रुग्णालयात टेस्ट टय़ूब बेबी सेंटर सुरू झाले असून या सेंटरमुळे गरजू व्यक्तीला परवडेल अशा खर्चात उपचार मिळणार आहेत.
कारण, ‘टेस्ट टय़ूब बेबी’ या आधुनिक उपचारपद्धतीसाठी लागणारा खर्च या खासगी रुग्णालयात अडीच ते तीन लाख रुपये इतका येतो. हा खर्च आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असणा-या रुग्णांना परवडण्याजोगा नसतो. मात्र, आता वाडिया रुग्णालयात या उपचारासाठी ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. याशिवाय रुग्ण दारिद्रय़रेषेखालील असल्यास उपचाराचा खर्च अजून कमी होईल. त्यामुळे, रुग्णांना फक्त ७० ते ८० हजार मोजावे लागणार आहेत.
प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचे सुख अनुभवता यावे याकरिता रुग्णालयाने उचललेले हे पाऊल ख-या अर्थाने कौतुकास्पद आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. पण, टेस्ट टय़ूब बेबी या उपचारपद्धतीचा अद्यापही काही लोक स्वीकार करत नाहीत. लोक काय म्हणतील याची त्यांना चिंता अधिक असते. त्यामुळे, या उपचारपद्धतीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात एकही दाम्पत्य अपत्याविना राहणार नाही.