वेळी-अवेळी जेवण, अनियमित झोप यामुळे मुंबई पोलिसांना विविध आजारांनी पछाडले आहे; तर अपघातातदेखील १७ पोलिसांचा मृत्यू ओढावण्याच्या घटना गेल्या वर्षात घडल्या. तब्बल १६३ पोलिसांचा गेल्या वर्षात मृत्यू झाला आहे. पैकी हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक म्हणजेच ३५ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.
वाकोला पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्यावर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना २ मे २०१४ रोजी घडली. या घटनेमुळे पोलिसांवरील ताणतणावाचा मुद्दा अधिक चर्चेत आला.
मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१५मध्ये १६३ ंपोलिसांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या ताणामुळे अर्थात हृदयविकारामुळे ३५ जणांनी जीव गमावला. त्यापाठोपाठ १६ पोलिसांचा कर्करोगाने, ७ पोलिसांचा क्षयरोगाने तर १७ पोलिसांचा अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते. गेल्या वर्षात ३६ जवानांचा आकस्मिक मृत्यू झाला असून, दोघांची हत्या झाल्याचे स्पष्ट होत आहे.