एटीव्हीएम, जेटीबीएस तिकीट सुविधा असूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी तिकीट खिडक्यांवर जाऊनच तिकीट काढतात. मात्र अपुरे मनुष्यबळ आणि तिकीट खिडक्यांमुळे प्रवाशांना तिकिटासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी मध्य रेल्वेला आणखी १२0 तिकीट खिडक्या आणि ३00 कर्मचाऱ्यांची गरज असल्याची माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य रेल्वेवर ४0 ते ४५ लाख प्रवासी ये-जा करतात. सध्या मेन आणि हार्बर लाइनवर एकूण ८३0 तिकीट खिडक्यांवर सेवा देण्यात येते. त्यासाठी १,४00 कर्मचारी कार्यरत आहेत. ही संख्या अपुरी आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर कामाचा बोजवारा उडत आहे. जवळपास आणखी १२0 तिकीट खिडक्या आणि ३00 कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात.
दररोज दहा लाख तिकिटांची विक्री
मध्य रेल्वेवर दररोज दहा लाख तिकिटांची विक्री होते. त्यामध्ये सहा लाख तिकिटे तिकीट खिडकीवरून विकली जातात. तर चार लाख तिकिटांची विक्री ही एटीव्हीएम, जेटीबीएसद्वारे आणि अन्य तिकीट सेवांतून होते.