चीनमधील शेन्झेन शहरात तब्बल २१ फुटबॉल मैदानांएवढे मोठे स्थानक साकार झाले आहे. फ्युटेन हायस्पीड रेल्वे स्टेशन या आशियातील सर्वांत मोठ्या भूमिगत रेल्वे स्थानकाचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. या स्थानकामुळे गाँगझो आणि हाँगकाँग प्रवासाच्या वेळात तब्बल अर्धा ते एक तासाची घट होणार आहे.
१.४७ लाख चौरस मीटर परिसरात हे स्थानक पसरले आहे. या तीन मजली स्थानकात १ हजार २०० आसने असून, तिथे एका वेळी सुमारे ३ हजार प्रवासी ट्रेनची प्रतीक्षा करू शकतील, अशी माहिती गाँगझो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या स्थानकामुळे शेन्झेनमधील रहिवासी अवघ्या १५ मिनिटांत हाँगकाँग गाठू शकतात. ३० डिसेंबर ते ९ जानेवारीदरम्यान या स्थानकातून रोज अतिवेगवान २२ ट्रेन्स ये-जा करतील.
अशी आहे रचना …
फ्युटेन रेल्वे स्थानक १०२३ मीटर लांब आणि ७८.८६ मीटर रुंद आहे. ओपन-कट पद्धतीने ३२ मीटर खोलीवर हे स्थानक उभारण्यात आले आहे.
पहिला मजला मेट्रो आणि अतिवेगवान ट्रेनच्या वाहतुकीसाठी आहे; शिवाय तिथे बिझनेस, व्हीआयपी लाउंज, कस्टम्स आणि इमिग्रेशन सुविधा उपलब्ध आहेत.
दुसऱ्या मजल्यावर देशाच्या विविध भागांत जाणारे मार्ग आहेत; तर तिसऱ्या मजल्यावर अतिवेगवान रेल्वेचे प्लॅटफॉर्म आहेत.