सीरियातील होम्स शहरात सोमवारी तीन बॉम्बस्फोट हल्ले झाले. यामध्ये ३०पेक्षा अधिक लोक ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. हे शहर असद सरकारच्या ताब्यात असून, याच महिन्यात बंडखोरांसोबत झालेल्या तहानुसार बंडखोरांनी शहर सोडले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यभागी असलेल्या एका रुग्णालयाजवळ हे स्फोट झाले. पहिला स्फोट एका कारमध्ये झाला. त्यानंतर एका व्यक्तीने आत्मघातकी स्फोट घडवून आणला. ज्याठिकाणी कारमध्ये स्फोट झाला होता त्याच ठिकाणी तिसरा स्फोट झाला. या हल्ल्यात ३०पेक्षा अधिक जण ठार झाले असून, अनेक जण गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यापूर्वी होम्स शहरातील पूर्व अल जाहरा परिसरामध्ये १२ डिसेंबरला एका रुग्णालयाजवळच दोन स्फोट झाले. यात १६ लोक ठार झाले होते. मागील पाच वर्षापासून सीरियामध्ये अनेक पातळीवर गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
सीरियन सरकार आणि बंडखोर यांच्या गटात युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे ‘इसिस’नेसुद्धा सीरियातील मोठय़ा भूभागावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे सीरियात सातत्याने बॉम्बस्फोट, गोळीबार होत आहे. रोज होणा-या या गोळीबाराला आणि हल्ल्यांना कंटाळून एक कोटीपेक्षा अधिक व्यक्तींनी सीरियातून काढता पाय घेतला आहे. या पाच वर्षात सीरियामध्ये २ लाख ५० हजारपेक्षा अधिक लोक ठार झाले आहेत. आतापर्यंत एक कोटी २० लाखांपेक्षा अधिक सीरियन नागरिकांनी देश सोडला आहे.