नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस आंबा तीन महिने आधीच भेटीला येणार आहे. हापूस आंब्याच्या आगमनासाठी अजून किमान तीन महिने असताना रत्नागिरीच्या पावस नजीकच्या गणेशगुळे येथील बागेत रत्नागिरी हापूस तयार झाला आहे.
नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचं औचित्य साधत फळांचा राजा खवय्यांना भेटायला कोकणातील बागेतून थेट बाजारपेठेत येत आहे. शशिकांत शिंदे या बागायतदाराने घेतलेल्या मेहनतीमुळे रत्नागिरीचा हापूस आंबा इतक्या लवकर तयार झाला आहे.
शिंदे यांच्या बागेतील आंब्याच्या पाच पेट्या बाजारात पाठवण्यात आल्या आहेत. या पेटीला प्रत्येकी किमान दहा हजार रुपयांचा दर मिळेल अशी शशिकांत शिंदे यांची अपेक्षा आहे. मात्र हा आंबा चाखण्यासाठी तुमचा खिसा मात्र जड हवा.