वाफेवरचे अनारसे आणि गठ्ठय़ाची भाजी

वाफेवरचे अनारसे आणि गठ्ठय़ाची भाजी

वाफेवरचे अनारसे :
साहित्य : 1 वाटी डालडा तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, अर्धा चमचा सोडा, दीड वाटी पिठी साखर, खसखस आणि  किसलेलं खोबरं.
कृती : प्रथम तूप हातानं फेटून घ्यावं. त्यात साखर घालावी. मैदा आणि रवा चाळून घालावा. याबरोबर त्यात सोडा घालावा. मिश्रण भाकरीच्या पिठाप्रमाणो मळावं. त्याचे गोल गोल सारख्या आकाराचे गोळे बनवावे.  गोळ्यांच्या वरच्या बाजूस खसखस व किसलेलं खोबरं लावावं. गॅसवर तवा ठेवावा.  त्यावर वाळू पसरवावी.  जर्मनच्या झाकणाला तूप लावून हे गोल गोळे त्यात ठेवावे. त्यावर ताट झाकावं. साधारणत: वीस मिनिटांनी अनारसे तयार होतात.  अनारसे थंड झाल्यावर खायला द्यावेत. हे पांढरे शुभ्र खमंग अनारसे आठ दिवस छान राहतात.
गठ्ठय़ाची भाजी :
साहित्य : 1 वाटी  भिजवलेली हरभराडाळ, 1 वाटी भिजवलेली मूगडाळ, आलं, लसूण, मिरची पेस्ट, कोथिंबीर,  एक वाटी चिरलेली मेथी किंवा पालक, मीठ, हळद, हिंग, तेल, जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो, खोबरे यांचं वाटलेलं वाटण,  अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन वाटय़ा पाणी.
कृती : भिजवलेल्या दोन्ही डाळी थोडय़ा निथळून मिक्सरमध्ये जाडसर वाटाव्यात.  त्यात मीठ, हळद, आलं, लसूण, मिरची पेस्ट, हिंग, चिरलेली कोथिंबीर, मेथी अथवा पालक घालावा. त्याचे सुपारी एवढे गोल गोळे बनवावेत.  ते चाळणीत ठेवून वाफवून घ्यावेत.
नंतर भाजीसाठी कढईत तेल घालावं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद घालावी. कांदा, टोमॅटो व ओलं खोबरं मिक्सरला बारीक वाटून घ्यावं. ते वाटण तेलात घालून परतावं. नंतर लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून हे वाटण परत चांगलं परतावं. तेल सुटलं की त्यात पाणी व वाफवलेले गोळे (गठ्ठे) घालावे आणि भाजीला छान उकऴी आणावी. वरतून कोथिंबीर घालावी. ही भाजी पौष्टिक व खायला रुचकर लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *