पर्यटकांसाठी आवडते ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. मात्र, माथेरानला जाण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे पर्यटकांना वाहनातून हेलकावे खात रानातल्या माथ्यावर जावे लागत आहे. दिवाळी हंगामात माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. मात्र, दुरवस्था झालेल्या रस्त्यांमुळे पर्यटकांचे हाल होत आहेत.
माथेरानला जाण्यासाठी दोन रस्ते असून नेरळ-माथेरान घाट रस्त्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. सात किलोमीटरच्या घाट रस्त्यापैकी चार किलोमीटरचा रस्ता अत्यंत ख़राब झाला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे एवढे मोठे आहेत की पर्यटन हंगामात एखादा खड्डा चुकविला आणि त्यानंतर अचानक समोर गाडी आल्यास अपघात होऊ शकतो.
असे असंख्य खड्डे रस्त्यावर पडले असून हे मार्ग हे सर्वाधिक धोकादायक ठरत आहेत. माथेरानचा दिवाळी हंगाम सुरू झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परंतु रस्त्याची पुरेशी डागडुजी करण्यात आलेली नाही.
नेरळ-माथेरान घाटरस्त्यातील महत्त्वाच्या भागाचा रस्ता गेल्या वर्षीच अत्यंत ख़राब झाला होता. त्यामुळे जुम्मापट्टीपासून माथेरानच्या दस्तुरीनाकापर्यंत असलेला रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा रस्ता पूर्णपणे खड्डय़ांनी भरला आहे.
तर दस्तुरीपासून खाली नेरळकडे उतरत असताना दरीच्या बाजूला असलेले लोखंडी कठडेही तुटलेले आहेत. या कठडे तुटलेल्या भागातून दोन वाहने खाली गेली होती. माथेरानसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी झालेली अशी स्थिती पर्यटकांचा हिरमोड करणारी आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीकामाला परवानगी दिल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.एम. कांबळे यांनी दिली. मात्र, कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पोलकम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.