जिल्हा रुग्णालयाला पाच डॉक्टरांचा ‘राम राम’

जिल्हा रुग्णालयाला पाच डॉक्टरांचा ‘राम राम’

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय अधिका-यांची रिक्त पदे भरण्यासाठी विशेष मुलाखत प्रक्रिया राबवल्यानंतरही जिल्हा रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिका-यांचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे.

जिल्हा रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी अचानक राजीनामा दिल्याने जिल्हा रुग्णालयाची वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे. याचा सर्वाधिक फटका सोनोग्राफी विभागाला बसला आहे. रेडिओलॉजिस्ट डॉ. डिकले यांनी राजीनामा दिल्याने सोनोग्राफी विभाग बंद झाला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांचा कोटा भरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या भरती प्रक्रियेद्वारे रत्नागिरी जिल्ह्यासाठी १२ नवे डॉक्टर उपलब्ध झाल्याने जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न काहीअंशी सोडवण्यात यश आले होते, परंतु खासगी रुग्णालयातून डॉक्टरांना मिळणा-या मोठय़ा पगाराच्या ऑफरने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील पाच डॉक्टर्सनी राजीनामा दिला आहे.

मागील तीन महिन्यांच्या कालावधीत पाच डॉक्टरांनी राजीनामा दिल्याने जिल्हा रुग्णालयाची वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे. राजीनामा दिलेल्या पाच डॉक्टर्सपैकी जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात नव्याने रूजू झालेल्या तीन नव्या डॉक्टर्सचा समावेश आहे.

यात डॉ. भाले, डॉ. डिकले, डॉ. गुरव या तीन वैद्यकीय अधिका-यांचा समावेश आहे. तर डॉ. विघ्नेश कदम आणि डॉ. निलोफर डोंगरकर या दोन जुन्या डॉक्टरांनीही राजीनामा दिला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत पाच वैद्यकीय अधिका-यांनी अचानक राजीनामा दिल्याने जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *