मंगोलियाच्या विकासाकरिता भारत एक अब्ज डॉलरची मदत पुरवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी केली. दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याबाबतचा विश्वासही दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
मंगोलिया देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. यावेळी मोदींनी मंगोलियाचे पंतप्रधान सैखनबिलेग यांच्याशी अनेक मुद्दयावर चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण, सायबर सिक्युरिटी, शेती, अपारंपारिक उर्जा आणि आरोग्य या क्षेत्रांतील १४ महत्त्वांच्या करारांवर यावेळी स्वाक्ष-या करण्यात आल्या.
मंगोलियाची आर्थिक क्षमता आणि मूलभूत सुविधांच्या विस्तारासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलरची मदत करणार असल्याची घोषणा मोदींनी स्टेट पॅलेसमध्ये पार पडलेल्या संयुक्त परिषदेत केली. तसेच आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी दोन्ही देश एकत्रित मिळून काम करतील असेही मोदींनी संयुक्त परिषदेत सांगितले.
भारत-मंगोलिया एकमेकांच्या सहकार्याने खूप वेगाने आर्थिक विकास साधू शकतील असेही मोदी म्हणाले. मंगोलियाच्या २५ वर्षीय लोकशाही व्यवस्थेत मला संसदेपुढे बोलण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत असल्याचे मोदी म्हणाले.