अनुष्काभेटीमुळे विराट पुन्हा वादात

अनुष्काभेटीमुळे विराट पुन्हा वादात

आपल्या चिडखोर स्वभावामुळे, आक्रस्ताळ्या वर्तनामुळे अनेकदा टीकेचं लक्ष्य ठरलेला आक्रमक क्रिकेटवीर विराट कोहली आता प्रेयसी अनुष्काच्या भेटीमुळे वादात सापडला आहे. रविवारी, दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराटनं स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या अनुष्का शर्माशी ‘गुटर्रगू’ केलं होतं. हा खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेचा भंग असल्यानं हे ‘मॅटर’ विराटला महागात पडू शकतं.

हैदराबादविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीनं पंच कुमार धर्मसेना यांच्याशी हुज्जत घातली होती. पाऊस सुरू असतानाही सामना का थांबवत नाही, म्हणून तो तावातावाने भांडला होता. त्यावरून, अनेकांनी विराटचे कान उपटले आणि ‘हे वागणं बरं नव्हं’, असं समजावलंही. विराटनं आत्मपरीक्षण करण्याची, रागावर नियंत्रण ठेवण्याची गरजही अनेकांनी व्यक्त केली. परंतु, या प्रकाराला दोन दिवस होत नाहीत, तोच रविवारी पुन्हा विराटनं आपल्या प्रेमासाठी – प्रेयसीसाठी महत्त्वाचा नियम धाब्यावर बसवला.

बेंगळुरू आणि दिल्ली यांच्यातील सामन्यावेळी पावसानं हजेरी लावली. त्यावेळी विराट कोहली आणि ख्रिस गेल पीचवर होते. पावसाचा रागरंग पाहून, पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेताच, विराट आणि गेल लगेचच पॅव्हेलियनमध्ये गेले. त्यानंतर काही मिनिटांतच, व्हीआयपी बॉक्सच्या शेजारी विराट आणि अनुष्का शर्माचं एकत्र दर्शन घडलं. हे खपाचं दृश्य सगळ्याच कॅमेऱ्यांनी अगदी व्यवस्थित टिपलं. ‘चिन्नास्वामी’वरील मोठ्या स्क्रीनवरही ते झळकलं आणि स्टेडियममध्ये एकच कल्ला झाला. परंतु, विराट-अनुष्का गप्पांमध्ये रंगून गेली होती. युवराज आणि कार्तिकनंही त्यांना थोडा वेळ कंपनी दिली. त्यानंतर, ‘झप्पी’ वगैरे देऊन या प्रेमपाखरांनी एकमेकांचा निरोप घेतला. या भेटीवरूनच विराट अडचणीत येण्याची शक्यता आहे.

virat-anushka
आयपीएल सामन्यादरम्यान कुठल्याही खेळाडूनं संघसहकाऱ्यांशिवाय कुणाशीही बोलू नये, असा नियम आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर तर, त्याचं तंतोतंत पालन होतंय की नाही, याकडे अँटी करप्शन सिक्युरिटी प्रोटोकॉल युनिटचं (एसीएसयू) बारीक लक्ष असतं. विराट कोहली हा बेंगळुरूचा कर्णधार असल्यानं त्याला हा नियम माहीत असेलच. परंतु तरीही, त्याला अचानक प्रेमाचं भरतं आलं आणि तो अनुष्काला जाऊन भेटला. एसीएसयूनं विराट हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. विराटच्या या नियमबाह्य वर्तनाकडे बीसीसीआयचंही लक्ष वेधणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

त्याचवेळी, आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनीही विराटचं वागणं अयोग्य असल्याचं स्पष्टपणे नमूद केलंय. एसीएसयूकडून अद्याप आपल्याकडे कुठलाही अहवाल आलेला नाही, पण हे असं व्हायला नको होतं, असं त्यांनी सूचित केलं. त्यामुळे विराटवर काय कारवाई होते, किंवा त्याला कशी समज दिली जाते, याकडे क्रिकेटवर्तुळाचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *