जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले सातारा जिल्ह्यातील पोगरवाडीच्या गावचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक यांना बुधवारी भारतीय लष्करातर्फे जम्मूतील बदामी बाग छावणीत मानवंदना देण्यात आली. यावेळी सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बीएसएफ आणि जम्मू पोलीस उपस्थित होते.
महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळगावी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. देशासाठी वीरमरण पत्करणारे संतोष महाडिक यांचे पार्थिव त्यांनी शिक्षण घेतलेल्या सातारा सैनिक शाळेच्या आवारात ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कर्नल महाडिक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सध्या त्यांचे कुटुंब काश्मीरमधील उधमपूरमध्ये राहायला होते.
महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण (सायन्स) महाविद्यालयात झाले होते. १९९८मध्ये ते लष्कराच्या विशेष दलात सहभागी झाले होते. त्यांना अतुलनीय शौर्याबद्दल पदकाने गौरवण्यात आले होते.