पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला घडवून १२९ निष्पाप नागरिकांचा बळी घेणा-या दहशतवाद्यांचा नि:पात करण्यासाठी फ्रान्सने बुधवारी जोरदार मोहीम उघडली. या मोहिमेतंर्गत फ्रान्स पोलीस, लष्कर आणि दहशतवादविरोधी पथकाने उत्तर पॅरिसमध्ये धडक कारवाई केली.
पॅरिस हल्ल्यातील मास्टरमाईंड सालेह अब्देसलाम हा एका हॉटेलमध्ये लपल्याच्या संशयावरून तुफान गोळीबार करत दोन संशयित दहशतवाद्यांना ठार करण्यात फ्रान्स पोलिसांना यश आले आहे. यावेळी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत सात जणांना अटक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पाच तासांहून अधिक काळ दहशतवादी व पोलीस यांच्यात ही चकमक सुरू होती. यावेळी एका दहशतवादी महिलेचा माग फ्रान्स पोलीस घेत असताना तिने आत्मघाती हल्ला करत स्वत:ला उडवून दिले. या चकमकीत फ्रान्सचे चार पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.
कारवाईच्या वेळी दहशतवादी दबा धरून बसलेल्या सेंट डेनिसमधील इमारतीला पोलिसांनी वेढा घातला. यावेळी फ्रान्स पोलीस आणि दहशतवाद्यांत बराच काळ धुमश्चक्री सुरू होती. यावेळी गोळीबार आणि स्फोटांचा आवाज रस्तोरस्ती घुमत होता. एक व्यक्ती सेंट डेनिस इमारत परिसरात दडून बसल्याची प्राथमिक माहिती फ्रान्स पोलिसांना मिळाली होती.
मात्र तो नेमका कोण आहे, हे स्पष्ट होत नव्हते. ‘सेंट डेनिस’ इमारत पॅरिस हल्ल्यातील मास्टरमाईंड अब्देल हमीद अबाउद हा इतर पाच जणांसह मोठय़ा शस्त्रसाठय़ासह दडून बसल्याची माहिती फान्सच्या पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला असून इतर एका दहशतवादी महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याचे फ्रान्स पोलिसांचे म्हणणे आहे.