वर्षभरात आपल्या खासदार निधीतील एक रुपयाही खर्च न केलेल्या महाराष्ट्रातील 30 खासदारांची नावे mplads.nic.in या शासकीय वेबसाईटच्याद्वारे समोर आली आहेत. याबाबतचे वृत्त दाखविल्यानंतर अनेक खासदारांनी यावर आक्षेप घेतला असून वेबसाईटवरील आकडेवारी ही दिशाभूल करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
mplads.nic.in. ही शासकीय वेबसाईट असल्याने यावरील माहिती ही अधिकृत आहे. मात्र, आपण कामं केली असल्याचा दावा अनेक खासदार करीत असून आता त्यांनी या वेबसाईटवरच आक्षेप घेतला आहे. ‘आम्ही काम केली असून वेबसाईटवरील माहिती चुकीची आहे.’ तसेच अनेक काम प्रस्तावित असल्याने त्याची माहिती अद्याप या वेबसाईटवर अपडेट झाली नसल्याचेही खासदारांचे म्हणणं आहे. खासदारांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.