तक्रार देण्यासाठी गेलेल्या दोन मॉडेल्सनी मुंबईच्या डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. पोलिस खऱ्या आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोपही या मॉडेल्सनी केला.
काही तरुण छेडछाड करत असल्याची तक्रार घेऊन पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता या दोन मॉडेल्स डी एन नगर पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यातही घेतलं. मात्र या मॉडेल्सने त्यांना ओळखलं नाही आणि खऱ्या आरोपींना पाठिशी घातल्याचा आरोप करत त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
काय आहे प्रकरण?
पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्त घरी परतत असताना रविवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही मॉडेल्स अंधेरी वेस्टच्या लिंक रोडवरील एका एटीएमजवळ थांबल्या होता. तेव्हा तिथे असलेल्या ऑडी कारमधील दोन तरुणांनी त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली. यावेळी तिथे पेट्रोलिंग करणारे पोलिस पोहोचले आणि त्यांना पाहून तरुणांनी तिथून काढता पाय घेतला.
पोलिसांनी दोन्ही तरुणांना जाणीवपूर्वक सोडून दिलं, असा आरोप या मॉडेल्सनी केला. त्यानंतर पोलिस त्यांना डी ए नगर पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले. मॉडेल्सच्या आरोपांनंतर पोलिसांनी दोन तरुणांना पोलिस स्टेशनमध्ये आणलं. परंतु हे ‘ते’ तरुण नसल्याचं सांगत पूजा आणि श्रुतीने त्यांना ओळखण्यास नकार दिला. याचवेळी दोघींची पोलिसांसोबत बाचाबाची आणि झटापट झाली. त्यामुळे पोलिसांनी दोघींवर भारतीय दंडविधान कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर दोघींना अटक केली आणि नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे या दोघींनाही लवकरच अटक केली जाईल, असं वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितलं. दोन्ही मॉडेल्सने संपूर्ण प्रकाराला दुजोरा दिला आहे, मात्र पोलिसांसोबत झटापट झाल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.