पॅरिस हल्ल्याचे धागेदोरे सापडले

पॅरिस हल्ल्याचे धागेदोरे सापडले

येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे धागेदारे आता सापडत असून दोन हल्लेखोरांची ओळख पटवण्यात फ्रेंच पोलीस व सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.

बॅटाक्लाँ कन्सर्ट हॉल येथे आत्मघातकी हल्ल्यात स्वत:ला उडवून देणारा दहशतवाद्याचे नाव ओमर इस्माईल मोस्तेफाई असून तो पॅरिसमध्येच राहणारा होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडील व भावाला कोठडीत टाकले असून त्याची मित्रमंडळी व नातेवाईकांचा शोध सुरू आहे. सीरियाचा पासपोर्ट मिळालेला दुसरा हल्लेखोर हा ग्रीसमधून निर्वासित म्हणून फ्रान्समध्ये घुसला होता.

पोलिसांनी सांगितले की, हे हल्लेखोर नवीन असले तरीही अत्यंत प्रशिक्षीत होते. त्यांनी सिरियातील लढय़ात भाग घेतला होता का याची माहिती घेतली जात आहे. हा हल्ला पूर्णपणे नियोजित, संघटित होता. त्याची पूर्ण आखणी परदेशात करण्यात आली होती.

सातपैकी सहा आत्मघातकी दहशतवाद्यांनी स्वत:ला उडवून दिले तर एक जण पोलीस गोळीबारात ठार झाला. फ्रान्सचे सरकारी वकील फ्रान्सिस्क्वा मोलीन्स म्हणाले की, या हल्ल्यात वापरलेले एक वाहन बेल्जियममध्ये नोंदवले गेले असून ते एका फ्रेंच माणसाने भाडय़ाने घेतले होते.

या हल्ल्याच्या तपासात फ्रान्स, बेल्जियम, ग्रीस व जर्मनी मदत करत आहेत. बेल्जियन पोलिसांनी अनेकांना अटक केली असून त्यापैकी एक जण पॅरिस हल्ल्याच्यावेळी उपस्थित होता. ज्या कारमधून दहशतवाद्यांनी गोळीबार केला ती पोलिसांना मॉँट्रेइलमध्ये सापडली आहे.

पॅरिसच्या पूर्व भागात सोडून दिलेल्या एका अनोळखी कारमध्ये अनेक ‘एके-४७’ रायफली सापडल्या आहेत. यामुळे काही दहशतवादी अद्याप मोकाट असावेत, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

आत्मघातकी हल्ल्याचे युरोपला आव्हान
या सातही हल्लेखोरांनी कंबरेला विशिष्ट पद्धतीने स्फोटके बांधली होती. तसेच त्याचा स्फोट घडवताना ते जराही बिचकले नाहीत. जिहादींची बदललेली रणनीती काळजीत टाकणारी आहे. कारण स्फोटकांचे पट्टे बांधायला खास तंत्रज्ञान लागते तसेच तज्ज्ञ लागतात, अशी माहिती फ्रान्सच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *