‘तो’ मृतदेह कांतिलाल जैन यांचाच !

रोहा तालुक्यातील तांबाटीच्या जंगलात काही दिवसांपूर्वी अध्र्याहून अधिक जळालेल्या अवस्थेत सापडलेला ‘तो’ मृतदेह अखेर अलिबागेतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कांतिलाल जैन यांचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यांच्या हत्येत त्यांच्याच व्यावसायिक भागीदाराचा हात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी या भागीदारासह एका महिलेला अटक केली आहे. या दोघांनाही १४ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

३० ऑक्टोबर २०१५ रोजी कांतिलाल जैन अलिबागेतून बेपत्ता झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ते न सापडल्याने अलिबाग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी रोहा तालुक्यातील तांबाटीच्या जंगलात अध्र्याहून अधिक जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटत नव्हती.

जैन यांच्या नातेवाईकांनीही हा मृतदेह जैन यांचा असल्याचे नाकारले होते. त्यामुळे पोलीस वेगळ्या दिशेने तपास करीत होते. अखेर या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. त्यानंतर या चाचणीतून हा मृतदेह कांतिलाल जैन यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या हत्येप्रकरणातील कारणांबाबत तपास करणे पोलिसांना शक्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *