मौल्यवान धातूच्या दरात झालेली घट धनत्रयोदशीला सुवर्णलाभ घेऊ पाहणाऱ्या खरेदीदारांच्या पथ्यावर सोमवारी पडली. त्याचबरोबर वाहन, वस्त्रे ते मोबाइल, विद्युत उपकरणे आदींची सणखरेदी उत्साहात झाली.
गेल्या आठवडय़ात सोन्याशी निगडित जाहीर झालेल्या सरकारच्या तीन योजनांबाबतची विचारणा तसेच गुंतवणुकीचा ओघही दिसल्याचे बँकेतील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. जवाहिऱ्यांकडे १० ग्रॅमपर्यंतच्या सोन्याच्या नाण्यांची मागणीही नोंदली गेल्याचे शहरातील अनेक सराफ दालनांच्या मालकांनी सांगितले. धनत्रयोदशीला मारुती कंपनीने एकाच दिवशी १५,००० वाहनविक्रीचा टप्पा पार करत असल्याचे जाहीर केले, तर नवरात्र ते दसरादरम्यान ९०,००० वाहनविक्री नोंदविणाऱ्या दुचाकी निर्मितीतील आघाडीच्या होन्डाने यंदाच्या धनत्रयोदशीला गेल्या वर्षांतील याच मुहूर्तातील १.६५ लाख वाहनविक्रीचा विक्रम मागे टाकण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट केले.
सुवर्णस्थिती!
धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला असलेले सध्याच्या सोन्याचे दर हे सहा टक्के कमी आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये धनत्रयोदशीला सोन्याचे दर तोळ्यासाठी २७,९२५ रुपये होते.
***
शहरात स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोन्याचे दर तोळ्यामागे १२० रुपयांनी कमी झाले. या धातूचा दर सोमवारी २६ हजारांच्या खाली २५,८०० वर नोंदला गेला, तर चांदीचा किलोचा दर १५० रुपयांनी रोडावत ३५,९८० रुपयांवर येऊन स्थिरावला.