चिनी फटाक्यांवर बंदी आणूनही देशी फटाके बाजारपेठेस १००० कोटींचा तोटा झाला असल्याची माहिती अॅसोचेमने दिली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाके उद्योगांसाठी अंधकाराची आहे.
अॅसोचेमने सांगितले की, सरकारने बेकायदा फटाके उत्पादकांवर कारवाई केली असून चीनमधून येणाऱ्या फटाक्यांवरही बंदी घातली आहे, पण चीनमधून फटाके आयात सुरूच आहे त्यामुळे फटाके उद्योगाला फटका बसला आहे. शिवकाशी व इतर १० महानगरांत फटाक्यांचे किरकोळ व्यापारी आहेत त्यांच्याकडे चिनी फटाक्यांचे साठे पडून आहेत व ते बेकायदेशीररीत्या विकले जात आहेत, त्यात अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, लखनौ व मुंबई यांचा समावेश आहे. फटाक्यांची मागणी ३५-४० टक्के घटली असून १००० कोटींचा तोटा झाला आहे. त्याचे कारण चिनी फटाके आहे. फटाक्यांच्या किमतीही १०-१५ टक्के वाढल्याने खपावर परिणाम झाला आहे असे अॅसोचेमचे सरचिटणीस डी.एस.रावत यांनी सांगितले. सरकारने फटाके प्रदूषणाविरोधात प्रचार करण्याचा आदेश दिल्याने त्याचाही परिणाम झाला आहे. उत्तर भारतात चिनी फटाके आल्याने देशी फटाक्यांना मागणी नाही. उत्पादन किंमत वाढल्याने भारतीय फटाके महाग आहेत. कारण त्यासाठी अॅल्युमिनियम, बेरियम नायट्रेट व इतर कच्चा माल लागतो. कामगारांची २० टक्के कमतरता आहे त्यामुळे तामिळनाडूत शिवकाशीत फटाके उत्पादनही कमी झाले आहे. तेथे १५० फटाके उत्पादक असून त्यांचा धंदा मंदीत आहे.
चिनी फटाक्यांची बेकायदा विक्री
कच्च्या मालाच्या दरात वाढ
कामगारांची २० टक्के कमतरता
सरकारची फटाकेविरोधी मोहीम
मागणीत ३५-४० टक्के घट
किमतीत १०-१५ टक्के वाढ