वासिम जाफर- रणजी स्पर्धेत दहा हजार धावा करणारा पहिला फलंदाज

वासिम जाफर- रणजी स्पर्धेत दहा हजार धावा करणारा पहिला फलंदाज

विदर्भचा सलामीवीर वासिम जाफरने रणजी करंडक स्पर्धेत दहा हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे.

‘दहाहजारी’ बनण्यासाठी जाफरला ८ धावांची आवश्यकता होती. बंगालचा मध्यमगती वीरप्रताप सिंगला लाँग ऑफला चौकार लगावत त्याने तो टप्पा गाठला. त्यावेळी विदर्भच्या क्रिकेटपटूंनी आपल्या सहका-याला उभे राहून मानवंदना दिली. दहा हजार धावांची मजल मारल्यानंतर जाफर (९) लागलीच बाद झाला. १९३४-३५मध्ये सुरू झालेल्या रणजी करंडक स्पर्धेत प्रथमच एखाद्या फलंदाजाला अभूतपूर्व कामगिरी करता आली आहे.

३७ वर्षीय जाफर या मोसमात विदर्भतर्फे खेळतोय. १२६व्या रणजी सामन्यात त्याने दहा हजार धावांचा पल्ला गाठला. देशांतर्गत (डोमेस्टिक) क्रिकेटमध्ये १७ हजारहून अधिक धावा करणा-या वासिमने रणजीसह (१०००२) दुलीप ट्रॉफी (२५४५) आणि इराणी चषकातही (१००८) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रणजीमध्ये सर्वाधिक धावा करण्यात मुंबईचा माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार (९२०९ धावा) आणि मिथुन मन्हास (८१९७ धावा) अनुक्रमे दुस-या आणि तिस-या स्थानी आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये २२९ सामन्यांत ५१ शतके आणि ८३ अर्धशतके ठोकणा-या वासिम जाफरने आजवर १७०८८ धावा केल्यात. मुंबईतर्फे सर्वाधिक धावा करूनही त्याचा विक्रम विदर्भतर्फे खेळताना झाला.

‘कुटुंबियांसह चाहत्यांना कामगिरीचे श्रेय’

रणजी करंडक स्पर्धेतील अविस्मरणीय कामगिरीचे श्रेय जाफरने त्याच्या कुटुंबियांसह क्रिकेटचाहत्यांना दिले आहे. ‘‘क्रिकेट खेळण्याला मी नेहमीच प्राधान्य दिले. मात्र इतकी वर्षे सातत्याने खेळणे, तितके सोपेही नाही. माझा स्वत:वर खूप विश्वास आहे. त्यातच कुटुंबीय आणि चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी मोलाचे ठरले,’’ असे वासिमने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *