भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त मुंबईतील जे. डी. भरडा हायस्कूलच्या ३०० विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांचे ७५० चौरस फुटांचे पोट्रेट तयार केले असून बालदिनाच्या आठ दिवस आधीच चाचा नेहरूंना आदरांजली वाहिली आहे.
मुंबईतील ग्रॅण्ट रोड येथील जे. डी. भरडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा विक्रम केला आहे. ६ नोव्हेंबर रोजी चर्नी रोड येथील बालभवनच्या प्रांगणात ही कलाकृती विद्यार्थ्यांनी तयार केली असून ही कलाकृती तयार करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे व शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका गीता उन्निथन यांनी सांगितले. यासाठी शाळेत अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांना सृजनात्मक काम करण्याची संधी दिली जाते, असेही उन्निथन यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना दीड फुटाचा माउंट बोर्ड दिला होता. सर्व विद्यार्थ्यांनी तो रंगवून त्याचे मोठे पोट्रेट तयार झाले. पोट्रेट रंगवताना विद्यार्थी बालभवनच्या हिरवळीवर रंगून गेले होते.
विशाल अरबी समुद्राच्या किनारी गिरगाव चौपाटीजवळ पंडित नेहरूंच्या प्रेरणेतूनच बालभवनची निर्मिती झाली असून याच बालभवनच्या हिरवळीवर आज विद्यार्थ्यांनी चाचा नेहरूंची कलाकृती बनवली. शाळेच्या या उपक्रमासाठी कलाशिक्षक प्रशांत ठाकरे, आदित्य उन्निथन, विक्रम शिरसाठ, सुधाकर पाटील, शिल्पा भेरे यांनी विशेष मेहनत घेतली.