अनेक गुन्ह्यांमध्ये भारताला हवा असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आज (शुक्रवार) सकाळी इंडोनेशियाहून भारतात आणण्यात आले. राजनला तब्बल 27 वर्षांनंतर भारतात परत आणण्यात यश आले आहे.
छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला इंडोनेशियातील बाली येथून विशेष विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर परत आणण्यात आले.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या दिल्ली येथील मुख्यालयात छोटा राजनला सध्या ठेवण्यात आले आहे. मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय मुंबई पोलिसांनी छोटा राजनच्या गुन्ह्यांचा तपासही सीबीआयकडे सोपवला आहे. या तपासात मुंबई पोलिस सीबीआयला आवश्यक ती मदत करेल, असे सरकारने सांगितले आहे.
इंटरपोलने छोटा राजनला बालीमध्ये अटक केल्यानंतर त्याला हस्तांतरित करून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भारतात छोटा राजनवर सुमारे 75 गुन्हे दाखल असून त्यापैकी 53 गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात आहे. त्याच्यावर टाडा आणि पोटा कायद्याच्या कलमांनुसारही काही गुन्हे दाखल आहेत.