“काही नेते फक्त प्रसिद्धीसाठी शाहरुखला लक्ष्य करून टीका करीत आहेत. शाहरुख खान हा चांगला अभिनेता आहे, त्याने देशाचे नाव उंचावले आहे. तो देशाचा अभिमान असून त्याच्यावर अशा प्रकारची टीका करणे बरोबर नाही,” अशा शब्दांत भाजपच्या खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने पाकिस्तानात जावे असे सांगत त्याच्याविरोधात टीकेची झोड उठविणाऱ्या भाजप नेत्यांना भाजप खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी घरचा आहेर दिला आहे. हेमा मालिनी म्हणाल्या, ‘शाहरुखला त्याचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.‘
देशात धार्मिक असहिष्णुता वाढत आहे, असे मत बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने व्यक्त केले होते. एसआरकेच्या पन्नाशीनिमित्त झालेल्या एका मुलाखतीत, त्याने असहिष्णुतेमुळे आपली अंधःकाराकडे वाटचाल होण्याची भीती व्यक्त केली होती. यामुळे भारताचा खरा चेहरा हरवत चालल्याची भावनाही शाहरुखने व्यक्त केली होती. शाहरुखच्या या वक्तव्यानंतर वाद उफाळून आला आहे. भाजप नेत्यांनी शाहरूखवर जोरदार टीका सुरू केली.
शाहरुख खान देशद्रोही असल्याचं वक्तव्य भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी केलं. तर शाहरुख पाकिस्तानचा एजंट असून त्याला तिकडेच पाठवावे असे साध्वी प्राची यांनी म्हटलं होतं.
यावर मग मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदनेही या वादात उडी घेतली. शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्याने पाकिस्तानात यावं, असं आमंत्रण हाफिजने दिलं.