दुधात भेसळ करणा-या तिघांना अटक

दुधात भेसळ करणा-या तिघांना अटक

दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. मुलुंड येथील डम्पिंग रोड येथे अशाच प्रकारची घटना घडल्याचे नुकतेच उघडकीस आले. दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी मिसळून भेसळयुक्त दुधाची विक्री करणा-या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २२ हजार रुपये किमतीचे ५५४ लिटर दूध जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेले दूध तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून लवकरच तपासणी अहवाल सादर करण्यात येईल.

मुलुंड कॉलनीसह डॅम्पिंग रोड परिसरात मागील अनेक वर्षापासून दूध भेसळ सुरू होती. याबाबत माहिती मिळताच ईशान्य मुंबई कॉँग्रेस सचिव दिलीप पाटील त्यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी राठोड व पोलिसांना याबाबत माहिती दिली. या महितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्या पथकाने या परिसरात धाड टाकली.

दुधात पाणी मिसळून भेसळ करत असताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर अन्य दोन जण पसार असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुधात भेसळ होण्याच्या घटना वाढतच आहेत. याकरिता नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. वारंवार होणा-या दूध भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय लहान मुलांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे दूध भेसळ करणा-यांवर सरकारने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *