उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव राज्यात पुढील दोन आठवडे कायम राहण्याची शक्यता असून, कमाल तापमानातही सरासरीपेक्षा किंचित घट होऊ शकते, असा अंदाज आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा खाली घसरू लागला आहे. सांताक्रूझ येथे गुरुवारी किमान तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी होऊन तापमानाचा पारा २० अंशांखाली गेला. सांताक्रूझ येथे १९.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
महाराष्ट्रातही गारवा वाढला
राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा खाली उतरले आहे. गुरुवारी गोंदिया येथे राज्यातील सर्वांत कमी, म्हणजेच १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही गारवा वाढला असून जळगाव येथे १३, नाशिक येथे १३.९, तर पुणे येथे १४.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. विदर्भातील यवतमाळ येथेही १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात मात्र किमान तापमान अद्याप १७ अंशांपेक्षा अधिक आहे.
तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता
सध्या कमाल तापमानाचा पारा अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त आहे. मात्र, हवामान मॉडेलनुसार, १३ ते १९ नोव्हेंबरदरम्यान उत्तर कोकणासह राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा किंचित कमी होऊ शकते. २० ते २६ नोव्हेंबरदरम्यान कोकण वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. कोकणात मात्र कमाल तापमान सरासरीपेक्षा काहीसे अधिक राहू शकते. २७ नोव्हेंबरनंतर तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
पाणी वाचवा; जलसंकट गडद
अपुरा पाऊस आणि जलस्रोतांमधील झपाट्याने घटणारा साठा यामुळे नागपूरपुढे पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तोतलाडोह धरणातील उपयुक्त जलसाठा बुधवारी केवळ २५.३३ टक्क्यांवर आला. गेल्या वर्षी याच काळात हा साठा ८९.५० टक्के होता. त्यामुळे येत्या काळात शहराला पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटला
बुधवारच्या जलसाठा अहवालानुसार, तोतलाडोह धरणाची क्षमता १,०१६.९३ दशलक्ष घनमीटर असून, सध्या केवळ २५७.६१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी ११ नोव्हेंबरला धरणात सुमारे ९१० दशलक्ष घनमीटर पाणी होते. यंदा हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटला आहे. उपयुक्त साठ्याव्यतिरिक्त १५० दशलक्ष घनमीटर मृतसाठा धरल्यास धरणातील एकूण पाणीसाठा ४०७.६१ दशलक्ष घनमीटर इतका आहे.
इतर जलाशयांमध्येही साठा घटला
जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या कामठी खैरी धरणाची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. या धरणात १४१.९८ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या तुलनेत ११३.७२ दशलक्ष घनमीटर, म्हणजे ८०.१० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ८५.४९ टक्के होता. त्यामुळे येथेही घट नोंदली गेली आहे. जिल्ह्यातील इतर जलाशयांमध्येही साठा घटला आहे. खिंडसीमध्ये ३५.४८ टक्के, नांदमध्ये ६१.३८ टक्के, तर वडगावमध्ये ४९.६० टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी या तिन्ही जलाशयांमध्ये जवळपास पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होते. यंदाची स्थिती जलव्यवस्थापनासाठी इशारा देणारी ठरत आहे.
