बहिणीला सतत त्रास देत मारहाण करणाऱ्या पतीचा अखेर मेव्हण्यानेच काटा काढल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली. रामबाग परिसरातील कुख्यात गुंड पलाश वासनिक याची त्याचा मेव्हणा चिंटू उर्फ आयुष धुपे आणि त्याच्या साथीदाराने मेडिकल चौकात निर्घृण हत्या केली. बहिणीला पतीकडून वारंवार होणारा त्रास आणि काल गुरुवारी रात्री पुन्हा झालेला वाद यामुळे संतप्त झालेल्या मेव्हण्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा घटनास्थळी होती. गुरुवारी रात्री घडलेल्या या हत्याकांडामुळे मेडिकल चौक परिसरात मोठी खळबळ उडाली.
पलाश वासनिक जुना हिस्ट्रीशूटर
पलाश वासनिक हा नागपूर शहरातील जुना हिस्ट्रीशूटर होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन महिन्यांपूर्वीच एमपीडीएअंतर्गत झालेल्या कारवाईतून तो कारागृहाबाहेर आला होता. मात्र, त्यानंतरही त्याचे वाद सुरूच होते. पलाश आपल्या पत्नीला नेहमी त्रास देत होता. तिच्यासोबत वाद घालणे, मारहाण करणे असे प्रकार वारंवार घडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याचा मेव्हणा चिंटू उर्फ आयुष धुपे याच्या मनात पलाशविषयी संताप होता. काल गुरुवारी रात्रीसुद्धा पलाशने पत्नीसोबत वाद घालून तिला त्रास दिला. ही बाब चिंटूला समजताच त्याचा संताप अनावर झाला. बहिणीला पुन्हा त्रास दिल्याचा राग मनात धरून चिंटूने एका साथीदाराच्या मदतीने पलाशला संपविण्याचा निर्णय घेतल्याची प्राथमिक चर्चा आहे. त्यानंतर मेडिकल चौकातील मेडिकलच्या प्रवेशद्वाराजवळ पलाश आला असताना दोघांनी त्याला गाठले.
पलाशवर धारदार शस्त्राने सपासप वार
पलाशला गाठल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यात वाद सुरू झाला. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. आरोपींनी पलाशवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पलाशला प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. तो रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. बाजूला असलेली सिमेंटची कुंडी उचलून त्यांनी पलाशच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. तसेच दगडाने ठेचून त्याची अक्षरशः निर्घृण हत्या केली. पलाशचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
अत्यंत वर्दळीच्या मेडिकल चौकात भररस्त्यावर हा थरार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी आपली वाहने कशीबशी तेथून बाहेर काढली. घटनेनंतर पलाशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. काही वेळातच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
