लोणी काळभोर येथे काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध ‘जगदंबा’ हॉटेलमध्ये जेवणाचे बिल दिल्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून माजी सरपंच राहुल काळभोर आणि त्याच्या साथीदारांनी तुफान राडा घातल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत हॉटेल व्यावसायिक, त्यांचे कुटुंबिय आणि कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली होती. काचेचं भांडं फेकून मारल्यानं फिर्यादी जखमी झाले होते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राहुल दत्तात्रय काळभोरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. जगदंब हॉटेल मालकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (एन्जेल हायस्कूलजवळ) येथील जगदंबा हॉटेलमध्ये ही संतापजनक घटना घडली. हे हॉटेल मागील ३० वर्षांपासून राजेंद्र चौधरी (वय ५६) हे चालवत आहेत. घटनेच्या रात्री आरोपी रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर हा जेवणासाठी हॉटेलमध्ये आला होता. जेवण झाल्यानंतर त्याने ऑनलाईन बिल दिले आणि ‘माझे बिल आले का?’ अशी विचारणा केली. हॉटेल मालकाने ‘हो, तुमचे बिल जमा झाले आहे’, असं सांगताच रामचंद्र काळभोर याने कोणतीही चिथावणी नसताना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
