ठाणे शहरात फटाक्यांमुळे आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या रॉकेटबंदीच्या आदेशानंतरही गेल्या २४ तासांत आगीच्या ११ घटना घडल्या. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सार्वजनिक रस्ते, चौक आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली असतानाही शहरात आतषबाजी सुरूच आहे. तीन हात नाका येथील १७ मजली कार्लाइल इमारतीला आग लागल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रॉकेटबंदीचा आदेश काढला होता. त्यानंतरही आगीच्या घटना थांबलेल्या नाहीत.
दहिसर गावात प्लास्टिकच्या गोदामाला आग
रॉकेटबंदीचा आदेश जारी झाल्यानंतरही शहरात सलग तीन दिवस फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाशेजारील सेवालालनगर येथे कचरा आणि ताडाच्या झाडाला आग लागली. वागळे इस्टेटमधील शांतिनगर आणि खारटनगर येथे ताडपत्रीने पेट घेतला. दिवा येथील चुहा पूल, पाचपाखाडीतील धर्मवीरनगर येथे कचऱ्याला, तर शिळफाट्यानजीक दहिसर गावात प्लास्टिकच्या गोदामाला आग लागली.
हातगाड्या जळून खाक
किसननगर येथील जय महाराष्ट्रनगरमधील भाजी बाजार परिसरातील हातगाड्या आगीत जळून खाक झाल्या. खारेगाव येथे गोदामाला आग लागून मंडपाचे साहित्य जळाले. या घटनांमागे पेटते फटाके आणि विद्युत् शॉर्टसर्किट ही संभाव्य कारणे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
१६२ जणांवर गुन्हे दाखल
ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात अवघ्या तीन दिवसांत फटाके फोडणाऱ्यांविरोधात तब्बल १६२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, ठाण्यात माजी महापौरांच्या संस्थेच्या वतीने आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात फटाक्यांची आतषबाजी केल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदेशाला केराची टोपली
अंबरनाथ:रॉकेट आणि सुतळी बॉम्बच्या वापरावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली असतानाही अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये या आदेशांची सर्रास पायमल्ली झाली. पाडव्याच्या दिवशी मध्यरात्री दीड ते दोन वाजेपर्यंत अनेक भागांत रॉकेट उडवण्यासह मोठ्या आवाजाचे फटाके फोडले जात होते. विशेष म्हणजे, पोलिसांची रात्री गस्त सुरू असतानाही आतषबाजी रोखण्यात यंत्रणेला अपयश आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना नागरिकांनी केराची टोपली दाखवली असताना पोलिसांची निष्क्रियताही चर्चेचा विषय ठरली आहे.
