भाऊबीजेआधी सौभाग्य हरपलं, पत्नीला माहेरी सोडून रेल्वे कर्मचारी माघारी, कुंड्या नीट करताना करुण अंत

पत्नीला भाऊबीजेसाठी माहेरी सोडून घरी परतलेल्या पतीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ३५ वर्षीय दीपक कुमार रेल्वेत नोकरीला होते. भाऊबीजेनिमित्त त्यांनी पत्नीला माहेरी सोडलं. त्यानंतर घराच्या छतावर जाऊन त्यांनी तिथे असलेल्या कुंड्या नीट ठेवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना मृत्यूनं गाठलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. उत्र प्रदेशच्या झाशी जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली.

प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू कछियाना मोहल्ल्यात दीपक कुमार वास्तव्यास होते. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता ते घराच्या छतावर कुंड्या नीट करत होते. या दरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. गंभीर अवस्थेत कुटुंबियांनी त्यांना रेल्वेच्या रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा सल्ला दिला. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं

दीपक कुमार रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. ट्रॉली मॅन म्हणून ते कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यानं ते काही दिवसांपासून घरीच होते. मंगळवारी दुपारी त्यांनी पत्नी आरतीला बंगराला जाणाऱ्या बसमध्ये बसवलं. आरती भाऊबीजेसाठी माहेरी गेल्या. घराच्या छतावर कुंड्या नीट ठेवत असताना दीपक कुमार तोल जाऊन खाली पडले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. व्हिडीओमध्ये सर्वात आधी घराच्या छतावरून एक कुंडी जमिनीवर पडताना दिसते. त्यानंतर पुढच्या काही क्षणांत दीपकदेखील छतावरून खाली पडतात.

दीपक यांचं घर एक मजली आहे. त्यांच्या छताला संरक्षक भिंत नाही. छताच्या कडेला कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याच नीट करत असताना दीपक खाली पडले आणि त्यांचा जीव गेला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबियांनी त्यांना तातडीनं रेल्वे रुग्णालयात नेलं. त्यांची अवस्था गंभीर असल्यानं त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण दीपक कुमार यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *