दुर्गम भागात वैद्यकीय सेवेचा गाजावाजा; राज्यातील 1450 पैकी रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला केवळ 5 डॉक्टर

राज्यात दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पोहोचवन्यासाठी डॉक्टरांच्या नियुक्तीचा गाजावाजा करण्यात आला असला तरी राज्यात 1450 नवनियुक्त डॉक्टरांच्या नियुक्तीनंतर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यासाठी फक्त पाच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 3 उपजिल्हा रुग्णालये, 8ग्रामीण रुग्णालये आहेत त्याशिवाय जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 68 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोग स्त्रीरोग , भूलतज्ज्ञ, अशा विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता असतानाही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अन्याय करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 3 उपजिल्हा रुग्णालये

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. ही प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये जी कोकणातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा समजली जातात. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 3 उपजिल्हा रुग्णालये आहेत. यामध्ये दापोली,चिपळूण व खेड या तालुक्यांचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातच भेदभाव करण्यात आला

दापोली, चिपळूण तालुक्यात कामथे तर खेड तालुक्यात कळंबणी यातील उपजिल्हा रुग्णालयांबरोबरच 8 ग्रामीण रुग्णालये आहेत. राजापूर , रायपाटण ,लांजा, पाली ,संगमेश्वर ,देवरुख , गुहागर ,मंडणगड आहेत त्याशिवाय जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 68 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सगळ्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय विशेतज्ञांची कमतरता आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्याने काही आपत्कालीन घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. असं असतानाही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डॉक्टरांच्या नियुक्तीमध्ये मात्र केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच भेदभाव करण्यात आला आहे.

खेड कळंबणी हे मुंबई गोवा महामार्गावरचे रुग्णालय

नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञांमध्ये गुहागर येथे स्त्रीरोग तज्ञ,राजापूर व रायपाटण येथे प्रत्येकी एक याप्रमाणे बालरोग तज्ञ, जिल्हा रुग्णालयात व गुहागर तालुक्यातील कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे एमबीबीएस डॉक्टर अशा पाच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड दापोली या तीनही ठिकाणी एकही विशेषज्ञ नियुक्त करण्यात आलेला नाही. दापोली व खेड या दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी व रुग्णांची संख्या मोठी आहे. यातील खेड कळंबणी हे मुंबई गोवा महामार्गावरचे रुग्णालय आहे.

पर्यटनासाठी महत्त्वाचा जिल्हा

महामार्गावर होणाऱ्या अपघातात रुग्णांना त्वरित उपचार मिळावे यासाठी हे रुग्णालय महत्त्वाच आहे. व्हेंटिलेटर सारखी महत्त्वाची लाखो रुपयांची उपकरणे वैद्यकीयविशेषज्ञ नसल्याने थेट रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याची वेळ अनेकदा येते. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय रुग्णालय मंजूर असले तरीही दापोली, खेड,मंडणगड परिसरातून हे अंतर जवळपास सुमारे 165 किलोमीटर आहे. या सगळ्या भौगोलिक स्थितीचाही विचार या नियुक्त्या देताना करण्यात आल्याचे दिसत नाही. आरोग्य प्रशासनाकडून व संबंधित लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्हा हा औद्योगिक व पर्यटनासाठी महत्त्वाचा जिल्हा मानला जातो.

येथील अद्ययावत आरोग्य सुविधांसाठी कोल्हापूर किंवा मुंबई, पुणे येथील शहरांवर अवलंबून राहावे लागते. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे 14 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून त्यांनी या सगळ्या विषयाची दखल घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णालयांना वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ यांची नियुक्ती करावी अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *