महिला हवालदार स्मिता मानेंचा संशयास्पद मृत्यूने कोकणात खळबळ; पोलीस कॉन्स्टेबल सचिनला अटक, नेमकं काय घडलं?

कणकवली पोलीस ठाण्याच्या महिला हवालदार स्मिता माने  संशयास्पद मृत्यू प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्मिता माने यांचे पती आणि स्वतः पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या सचिन माने याला कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे.

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्मिता माने यांचा मृतदेह बिडवाडी–हुंबरणे येथील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेने पोलीस दलासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. स्मिता माने यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पती सचिन माने हा स्मिता यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली किंवा घातपाताने त्यांची हत्या करण्यात आली, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

सचिन मानेला बेड्या, आज न्यायालयात हजर करणार-

मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला असून प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास सचिन मानेला बेड्या ठोकल्या. सचिन मानेला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात शवविच्छेदन अहवालानंतर आणखी काय मोठे खुलासे होतात? यानंतर पोलीस तपासाला वेग येणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदुर्गातील कणकवली पोलीस ठाण्यात महिला हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता सचिन माने यांचा बिडवाडी हुंबरणे येथील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे पती आणि पोलिस शिपाई सचिन माने यांनी पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिस दलासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्मिता आणि सचिन माने या दोघांचीही नुकतीच कणकवलीतून वैभववाडी पोलिस ठाण्यात प्रशासकीय बदली झाली होती. तेथे जाण्यासाठी सामानाची पॅकिंग करण्यासाठी दोघांनी 8 आणि 9 ऑक्टोबर ला सुट्टी घेतली होती. 9 ऑक्टोबर ला सकाळी 8 वाजता सचिन यांना जाग आली असता पत्नी घरात नव्हती. तिचा मोबाईलही हॉलमध्येच होता. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने अखेर त्यांनी सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान अज्ञाताने पत्नीचे अपहरण केल्याची तक्रार कणकवली पोलिसांत दिली. या तक्रारीनंतर पोलिस शोध घेत असतानाच दुपारी बिडवाडी हुंबरणे येथील जंगलात स्मिता माने यांचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपहरणाची तक्रार आणि त्यानंतर आढळलेला मृतदेह यामुळे या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. सध्या पती सचिन माने याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *