एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आंदोलन करणार; पूर्णेकर यांच्या पुत्राचा निर्धार, CBI तपासाची मागणी

शिवसेना उबाठा पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असून, नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस संपण्यापूर्वी आम्हाला न्याय न मिळाल्यास उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसणार असल्याचा निर्धार मृत पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी सोमवारी व्यक्त केला. या हत्या प्रकरणात सूत्रधारांवर कारवाई करावी, तसेच सीबीआय व सीआयडीमार्फत तपास करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, मनसे नेते अविनाश जाधव, आगरी समाजबांधव आणि विविध आगरी संघटनांनी दिलेल्या पाठिंब्याचा त्यांनी उल्लेख केला. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले; मात्र अद्याप भेट होऊ शकलेली नाही, अशी खंत राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली

या प्रकरणाची चौकशी जलदगतीने करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपचे नेते, आमदार, माजी खासदार व नगरसेवकांनी आमच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कोणीही भेटायला आले नाही, असे राम पूर्णेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पाचव्या आरोपीवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपीच्या शरीरयष्टीवरून आणि देहबोलीवरून तो सीसीटीव्हीतील हेल्मेटधारी व्यक्ती असल्याचे वाटत नाही, असा दावा पूर्णेकर यांनी केला. त्यामुळे या प्रकरणातील सर्व संशयितांची भूमिका आणि हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली.प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू यांना ठाणे न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कनोजिया आणि अमित यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी या दोघांना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात केली. आरोपींचे मोबाइल, गुन्ह्यावेळी वापरलेले कपडे जप्त करणे बाकी आहे. त्यांच्या बँक खात्यातील व्यवहारांची माहिती घ्यायची असून, त्यांना कोणी आर्थिक मदत केली आहे का, याचीही चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. घटनास्थळावरील हेल्मेटधारी व्यक्ती अमित असल्याची बाब तपासात समोर आली आहे. संबंधित हेल्मेट जप्त करायचे आहे. हत्येचा कट कोठे रचला, याचा तपास करायचा असून, अटकेतील सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी आवश्यक असल्याचेही पोलिसांनी न्यायालयात मांडले. सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, सुभाष ऊर्फ पप्या शिंदे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्यालाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या कोठडीत एक दिवस वाढ करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *