इलेक्ट्रिक गरम पाण्याची पिशवी मानेखाली ठेवून झोपलेल्या 30 वर्षीय आयटी अभियंत्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगावशेरी येथील सोमनाथनगर परिसरात ही घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून, तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनंतर राहत्या खोलीत आढळून आला.
मृत तरुणाचे नाव रोहन कुबडी (30) असे आहे. रोहन हा अविवाहित असून, गेल्या तीन महिन्यांपासून सोमनाथनगर परिसरातील एका इमारतीत भाड्याने एकटाच राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, रोहनने दोन दिवस आपल्या खोलीचे दार उघडले नव्हते. त्यानंतर खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने घरमालकाला संशय आला. त्यांनी रोहनच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर घरमालकाने खोलीचा दरवाजा उघडला असता रोहन बेडवर मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत होता, तसेच बेडवर रक्तही आढळून आल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती तातडीने चंदननगर पोलिसांना देण्यात आली. इलेक्ट्रिक गरम पाण्याच्या पिशवीमुळे विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
