दीड कोटी हेक्टरवर पिकांचे नुकसान; 4 ते 5 दिवसांत पंचनामे पूर्ण करणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

पावसातील खंडामुळे राज्यात सुमारे एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत एक कोटी हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनाम्यांचे काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चारा याबाबत नियोजन करून टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतून नियमानुसार मदत करण्यात येईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

मंत्री भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील राजापूर व बुरलेवाडी येथे दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खरीप पिकांची सद्यःस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाचे प्रमाण, पिकांची वाढ, पाणी उपलब्धता आणि शेतीच्या नुकसानाबाबत माहिती जाणून घेतली.

‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि पंचनाम्यांची कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करावी,’ असे निर्देश त्यांनी दिले. सांगोला तालुक्यात पीक पंचनाम्यांचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुरू असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री भरणे यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि संभाव्य पीक नुकसानाबाबतच्या अडचणी मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *