प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाईंड टल्लीसह एकाला अटक, प्रयागराजमध्ये सापळा रचून धरलं; पोलिसांची धडक कारवाई

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याच्यासह अमित सिंग उर्फ पपलू हे दोघे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती लागले असून या दोघांना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एसआयटीचे प्रमुख पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. या दोघांच्या चौकशीत हत्या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे. कनोजियाविरुद्ध लूक आउट सर्क्युलर काढण्यात आले होते.

निखिल आणि नितेश जेरबंद

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या आरोपींमध्ये सुभाष उर्फ पप्या शिंदे, निखिल यादव उर्फ शूटर ,संतोष कनोजिया उर्फ टल्ली या तिघांसह अन्य दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. चौकशीत चौथा आरोपी नितेश पवार असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी सुरुवातीला पप्या शिंदे याला अटक केल्यानंतर निखिल आणि नितेशला जेरबंद केले. तिन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.

उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमधून अटक

संतोष आणि पाचव्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु होता. पोलिसांची पथके उत्तरप्रदेशाला रवाना करण्यात आली होती. अखेर या पथकांना संतोष कनोजिया आणि अन्य एकाला ताब्यात घेण्यामध्ये यश आले. उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमधून संतोष(४१) आणि अमित सिंग उर्फ पपलू (३४) यांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. या गुन्ह्यातील पाचवा आरोपी अमित असल्याचे त्यांनी सांगितले. रिक्षाचालक असलेला अमित भाईंदर पूर्व भागात राहत असून तो मुळचा बनारसचा आहे. तर संतोष ठाण्यातील मानपाडा येथे राहतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दोघांना घेऊन पोलिस पथक आज, शनिवारी प्रयागराजमधून ठाण्यात येण्यासाठी निघतील, असेही सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *