सोलापूर शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये एका तरुणीचा अतिदक्षता विभागात विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातील विजयपूर येथून उपचारासाठी आलेल्या तरुणीवर शहरातील नामांकित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात हा प्रकार घडल्यानं सोलापुरात खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील एका सफाई कर्मचाऱ्याकडून गैरकृत्य केल्याची घटना बुधवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद बुधवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून संबधित कर्मचाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून विशाल शिवाजी कांबळे (वय ३५, रा. लष्कर, सोलापूर) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
उपचारासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग
पीडित तरुणी आजारी असल्यानं ती सोलापुरातील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी मध्यरात्री २ वाजता दाखल झाली होती. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तेथे काम करणाऱ्या नराधमाने पीडित तरुणीसोबत केलेल्या गैरकृत्य केल्यानं हिंदवी सेनेचे सुधीर बहिरवाडे यांनी ताबडतोब हॉस्पीटलमध्ये जाऊन जाब विचारला. या गंभीर प्रकरणाची गंभीर दखल घेत हॉस्पिटल प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
हॉस्पिटल प्रशासनाची प्रतिक्रिया
‘नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर आम्ही हॉस्पिटल प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी करून पोलिसांना कळविले. पोलिसांना आम्ही पूर्णपणे सहकार्य केलं, पोलीस तपास करीत आहेत, चौकशीत जे सत्य बाहेर येईल, त्यानुसार संबंधितावर कारवाई होईल’, असं हॉस्पीटल प्रशासनाने सांगितलं.
सफाई कर्मचारी घटनास्थळावरून पसार
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच आरोपी सफाई कर्मचारी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून, महिला आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण सोलापुरात संतापाची लाट पसरली आहे. पीडित तरुणीचे नातेवाईक देखील कर्नाटकातून सोलापूरमध्ये दाखल झाले आहेत.
