35 वर्षीय तरुणाचं 19 वर्षीय युवतीशी दुसरं लग्न, चार महिन्यात मृत्यूला कवटाळलं, मेहुण्याला शेवटच्या फोनमध्ये 4 शब्दात व्यथा मांडली

धुळे जिल्ह्यातील तापी नदीत गुरुवारी दुपारी ३५ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या १९ वर्षीय पत्नीचं शव आढळलं. त्यांचे पाय एकमेकांना साखळीने बांधलेले होते आणि त्याला कुलूप लावलं होतं. दोघांनीही एकत्र मृत्यूला कवटाळल्याचा अंदाज आहे. मात्र त्याआधी तरुणाने पत्नीच्या भावाला मध्यरात्री फोन करुन चार शब्दात आपली व्यथा व्यक्त केली होती, अशी माहिती मिळत आहे.

जळगावातील जोडप्याची बॉडी तापी नदीत

३५ वर्षीय श्याम पाटील आणि त्यांची १९ वर्षीय पत्नी सपना पाटील अशी मृतांची ओळख पटली आहे. ते मूळ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसे गावचे रहिवासी होते. प्राथमिक तपासानंतर नरडाणा पोलिसांना हे आत्महत्येचे प्रकरण असावे, असा संशय आहे. मात्र त्यांच्यासोबत घातपात झाला आहे का, याची शक्यताही पडताळून पाहिली जात आहे.

साखळीने पाय बांधून कुलूप लावलं

गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तापी नदीत दोन मृतदेह तरंगताना पाहून काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना असे आढळून आले की, त्या पुरुषाचा एक पाय आणि महिलेचा एक पाय साखळीने एकमेकांना बांधलेले असून त्यावर कुलूप लावले होते.

२४ तास आधीच पाण्यात बुडल्याचा अंदाज

नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी सांगितले की, “स्थानिक रहिवाशांना घटनास्थळाजवळ बुधवार दुपारपासून एक बाईक उभी असल्याचे दिसले होते. यावरुन असं सूचित होतं की, त्या जोडप्याने किमान २४ तास आधीच पाण्यात बुडून जीव दिला असावा.”

मेहुण्याला फोन, चार शब्दात व्यथा मांडली

वाहनाच्या नोंदणी तपशीलावरुन जोडप्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी श्यामच्या मेहुण्याशी संपर्क साधला. एपीआय सचिन कापडणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामच्या मेहुण्याने सांगितले की, “बुधवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास श्यामने मला फोन केला होता आणि ‘सर्व काही संपले आहे’ असे म्हटले होते.”

“श्यामने फोन बंद करण्यापूर्वी मेहुण्याला सांगितले की तो निघून जात आहे. त्यानंतर वारंवार फोन करुनही श्यामच्या मेहुण्याला त्याच्याशी संपर्क साधता आला नाही,” असे कापडणीस म्हणाले. त्या फोन कॉलनंतर काही वेळातच हे जोडपे पाण्यात बुडाले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.

चार महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न

जळगावमधील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या श्यामचे सपनासोबत सुमारे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे त्याचे दुसरे लग्न होते. या जोडप्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, त्यामागच्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

गावी नेले नाही म्हणून चंद्रपुरात विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

दुसरीकडे, बरं नसूनही गावाला नेले नाही म्हणून पाचवीतील विद्यार्थ्याने शाळेत आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली. जीवन विलास झरेकर, असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शहराजवळील विसापूर येथील सन्मित्र सैनिकी शाळेत शिकत होता.

वडिलांनी पुन्हा शाळेत सोडल्याचा राग

सैनिकी शाळेत जीवनचे हे पहिलेच वर्ष होते. गुरुवारी त्याला त्वचा विकाराचा त्रास सुरू झाला. शाळा व्यवस्थापनाने त्याच्या वडिलांना बोलावून घेतले. तो पूर्णपणे बरा होईपर्यंत चार दिवस त्याला गावी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. वडिलांनी मुलाला डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार केले. दोन तासांतच पुन्हा शाळेत आणून सोडले. यामुळे तो निराश झाला. सात-आठ मिनिटे रडत राहिला. हताश होऊन त्याने वसतिगृहातील कॉटजवळ कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून जीव दिला. ही संपूर्ण हृदयद्रावक घटना शाळेतील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृत्यूला कवटाळत असल्याचे फुटेजमधून स्पष्ट झाल्याचे रामनगरचे पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *