महाराष्ट्राच्या वातावरणात बदल! उष्णतेची लाट येणार, अंगाची लाहीलाही होणार, हवामान खात्याकडून 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातून परतीच्या मान्सूनची माघार झाल्यानंतर बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली असून, तापमानात वाढ होत आहे. राज्यात सध्या उष्ण, दमट आणि ढगाळ हवामान दिसत आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता असली, तरी राज्यभर जोरदार पावसाचे संकेत नाहीत. अशा परिस्थितीत आज शनिवारी रोजी कोकणापासून विदर्भापर्यंत हवामान कसं राहणार? याबाबत हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

कोकण विभागात पुन्हा एकदा तापमानात वाढ होताना दिसत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत यलो अलर्ट असून उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात नागरिकांच्या अंगाची लाहीलाही

उत्तर महाराष्ट्रातही दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत कोणताही विशेष हवामान अलर्ट नसून, प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसही अशाच प्रकारचे हवामान राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. विशेष म्हणजे, उत्तर महाराष्ट्रात नागरिकांची उन्हामुळे लाहीलाही होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीच्या काही भागांसह घाटमाथ्यावर हलक्या सरी आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. मात्र, सर्वदूर पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. या विभागात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भातही पावसाची उघडीप

विदर्भातही मागील अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. विशेष हवामान अलर्ट नसून, बहुतांश भागांत उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. राज्यातील हवामानाचा आढावा घेतल्यास कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असून, सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र, उर्वरित राज्यात प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे. परतीच्या मान्सूननंतर पावसाची उघडीप आणि वाढते तापमान यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. नागरिकांनी उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *