40 लाख खर्च करुन परदेशी, 25 वर्षीय तरुणाचा अमेरिकेत अपघाती मृत्यू, लेकाच्या अखेरच्या दर्शनासाठी आईचा खटाटोप

 हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाचा अमेरिकेत ट्रक अपघातात मृत्यू झाला. हा तरुण अनधिकृत स्थलांतर मार्गाने (ज्याला ‘डंकी रुट’ म्हटले जाते) अमेरिकेत पोहोचला होता आणि त्याच्या परदेश प्रवासासाठी कुटुंबाने सुमारे ४० लाख रुपये खर्च केले होते. तो ट्रक चालवत असताना गाडी उलटल्याने हा अपघात झाला; आता त्याचे पार्थिव मायदेशी नेण्याची व्यवस्था करताना कुटुंबाची मोठी ओढाताण होत आहे.

मृत तरुणाचे नाव जतिन आहे, जो हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील सिकरी गावचा रहिवासी होता. इंग्लंडमार्गे ‘डंकी रुट’चा वापर करुन अमेरिकेत पोहोचल्यानंतर तो तिथे ट्रक चालक म्हणून काम करत होता.

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जतिनने २०२२ मध्ये सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन इंग्लंडला जाण्यासाठी भारत सोडला होता. त्यानंतर अनधिकृत मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला होता. तो कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये राहत होता आणि ट्रक चालक म्हणून काम करत होता.

कुटुंबावर आभाळ कोसळलं

हा अपघात बुधवारी पहाटेच्या सुमारास झाला. जतिनचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती; त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमेरिकेतच राहणाऱ्या त्याच्या मावशीचा मुलगा विशाल याने या दुर्दैवी घटनेची माहिती कुटुंबाला दिली.

“आमच्यावर जणू आभाळच कोसळले आहे. कृपया आमच्या मुलाला परत आणा” असे म्हणत त्याची शोकाकुल आई रेखा यांनी त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदतीचे आवाहन केले. जतिनचे वडील रामपाल हे शेतकरी आहेत. त्याच्या कुटुंबात आई, मोठा भाऊ साहिल आणि एक धाकटी बहीण यांचा समावेश आहे.

कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, “अमेरिकेतून जतिनचं पार्थिव मायदेशी आणण्यासाठी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी केंद्र व हरियाणा सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *