निष्काळजीपणाचा बळी! नाशिकमधील जेष्ठाचा दुचाकीसह खड्ड्यात पडल्यानं करुण अंत; मनुष्यवध गुन्ह्याची मागणी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांमुळे बळींची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी (दि. ७) रात्री प्रभाग क्र.२३ मधील राजीवनगर – कलानगर मार्गावर खोल खड्ड्यात पडून ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे सिंहस्थ कामे आणि खड्ड्यांच्या चौदाव्या बळीची नोंद झाली आहे.

रस्त्याच्या मध्यभागी खोदून ठेवलेल्या सुमारे १२ ते १५ फूट खोल खड्ड्यात दुचाकीसह पडून पाटबंधारे खात्याचे माजी उपअभियंता प्रकाश वंडेशकर यांचा बुधवारी (दि. ७) रात्री मृत्यू झाला. प्रकाश वंडेशकर हे गुरुवारी रात्रीच्या सुमारास कलानगरकडून राजीवनगरच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जात होते. राजीवनगर परिसरात रस्ता व ड्रेनेजचे काम सुरू असून, मोठा खड्डा खोदून तो सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक स्थितीत ठेवण्यात आला होता.

रस्त्याचे काम सुरू असताना, या ठिकाणी सुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आलेली नव्हती. रात्रीच्या वेळी या परिसरात पुरेसा प्रकाश नसल्यामुळे वंडेशकर यांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. कबीरनगर झोपडपट्टी प्रकरणातील सिद्धार्थ गोरे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतरही ठेकेदारांकडून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

जीव गेल्यानंतर सुरक्षाव्यवस्था

या रस्त्यावर घटनास्थळी पुरेसे बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर किंवा इशारा फलक नसल्याने रात्रीच्या अंधारात वंडेशकर यांना खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर शुक्रवारी प्रशासनाने घटनास्थळी सुरक्षेची उपाययोजना सुरू केली. क्रेन व हायड्राच्या साहाय्याने सिमेंटचे मोठे ब्लॉक आणून खड्ड्याभोवती बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. मात्र, ‘जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग आली का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *