विष्णुदास भावे नाट्यगृहाला वाळवीची लागण;१३ कोटींच्या डागडुजीवर प्रश्नचिन्ह, कामाच्या चौकशीची मागणी

विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबईतील प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. नाट्यप्रयोगांसह विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम येथे नियमितपणे होतात. दररोज मोठ्या संख्येने नागरिक, कलाकार आणि प्रेक्षकांची ये-जा असते. नाट्यगृहातील आसनव्यवस्थेच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर लाकडी फर्निशिंग करण्यात आले आहे. त्यातील काही भाग वाळवीने पोखरल्याचे निदर्शनास आले आहे.

देखभाल व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण

नाट्यगृहात महिला आणि पुरुष कलाकारांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत. या खोल्यांचे लाकडी दरवाजे आणि चौकटींनाही वाळवी लागल्याचे आढळले आहे. नाट्यगृहात नियमितपणे पेस्ट कंट्रोल केले जाते, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. तरीही लाकडी कामाला वाळवी लागल्याने पेस्ट कंट्रोलची कार्यपद्धती आणि देखभाल व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

कामाची चौकशी केली जावी अशी मागणी

२०१९ मध्ये नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्ती आणि डागडुजीसाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या कामासाठी नाट्यगृह काही काळ बंदही ठेवण्यात आले होते. एवढ्या मोठ्या खर्चानंतरही काही वर्षांतच लाकडी काम वाळवीच्या विळख्यात सापडल्याने डागडुजीत कोणत्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले, तसेच कामाची गुणवत्ता आणि देखभाल कशी केली जाते, याची चर्चा सुरू झाली आहे.या कामाची चौकशी केली जावी अशी मागणी केली जात आहे.

कलाकारांकडून प्रशंसा

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह म्हणजे नवी मुंबई महापालिकेची शान आहे. राज्यातील सर्व नाट्यगृहांपैकी अत्यंत चांगल्या दर्जाचे सुविधा असणारे नाट्यगृह म्हणून भावे नाट्यगृहाकडे पाहिले जाते. अनेक नाट्यकलावंत या नाट्यगृहाची प्रशंसा करत असतात. चांगल्या प्रकारच्या सुविधा या नाट्यगृहात मिळत असल्याचे वारंवार जाहीरपणे सांगत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *