20 लाख फुकट्या प्रवाशांकडून 159 कोटी रुपये दंड वसूल, मध्य रेल्वेची मोठी दंडात्मक कारवाई

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात मध्य रेल्वेकडून कठोर कारवाई केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधातील दंड वाढवत कारवाई देखील तीव्र केली होती. याच कारवाईबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेने २०.४७ लाख विनातिकीट प्रवाशांकडून १५९.३४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. दररोज सरासरी ११,१८४ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई आणि ८७ लाख रुपयांहून अधिक रकमेची वसुली करण्यात आली आहे.

सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री करण्याच्या आपल्या कटिबद्धतेनुसार, मध्य रेल्वेने आपल्या संपूर्ण नेटवर्कवर अनधिकृत आणि विनातिकीट प्रवासाविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. किमान दंडाच्या रकमेत झालेली वाढ आणि तिकीट तपासणीच्या तीव्र मोहिमांमुळे आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये (सप्टेंबर २०२६ पर्यंत) महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आले आहेत.

एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत विक्रमी कारवाई आणि महसूल

एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट किंवा अयोग्य/अवैध प्रवास प्राधिकरणासह प्रवास करणाऱ्या २०.४७ लाख प्रवाशांना पकडले आणि १५९.३४ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला. गेल्या वर्षी याच कालावधीत २०.०५ लाख प्रकरणे आणि ११६.४६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता, त्या तुलनेत ही आकडेवारी अधिक आहे. यावरून उत्पन्नात ३७ टक्क्यांपेक्षा जास्त लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.

दंड वसुली आणि प्रकरणांची संख्या

  • एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील विभागनिहाय कामगिरी:
  • मुंबई विभाग: १०.११ लाख प्रकरणांतून ६६.९२ कोटी रुपये.
  • भुसावळ विभाग: ३.७७ लाख प्रकरणांतून ३८.९० कोटी रुपये.
  • पुणे विभाग: २.१३ लाख प्रकरणांतून १८.६८ कोटी रुपये.
  • नागपूर विभाग: २.३६ लाख प्रकरणांतून १७.९३ कोटी रुपये.
  • सोलापूर विभाग: १.१० लाख प्रकरणांतून ७.२७ कोटी रुपये.
  • मुख्यालय: ०.९९ लाख प्रकरणांतून ९.६३ कोटी रुपये.

सप्टेंबर २०२६ महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट किंवा अवैध तिकीटासह प्रवास करणाऱ्या २.४४ लाख प्रवाशांना शोधले आणि १८.५३ कोटी रुपये दंड वसूल केले.

वैध तिकिटाशिवाय प्रवास करणे हा रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा आहे आणि त्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेच्या महसुलावरही परिणाम होतो; हा महसूल प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी वापरला जातो.

विनातिकीट प्रवासासाठी किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आल्यानंतर, मध्य रेल्वेने आपल्या संपूर्ण नेटवर्कवर तिकीट तपासणीची तीव्र मोहीम सुरू ठेवली आहे. यासाठी स्थानकांवरील तपासणी, अचानक तपासणी, ‘फोर्ट्रेस’ तपासणी (स्थानक पूर्णपणे सील करून केलेली तपासणी), सखोल तपासणी आणि ‘मेगा’ तिकीट तपासणी मोहीम अशा विविध पद्धतींचा अवलंब केला जात आहे. या मोहिमा मेल/एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, विशेष गाड्या तसेच मुंबई आणि पुणे विभागांतील उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये राबविल्या जातात.

प्रवाशांना आवाहन

गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकीट काढून सन्मानाने व जबाबदारीने प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना करत आहे. विनातिकीट प्रवासाबाबत रेल्वेचे धोरण ‘झिरो टॉलरन्स’ (कोणतीही सवलत न देणारे) आहे आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व सन्मानजनक असेल याची खात्री करण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *