मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेचे वेळापत्रक सध्या पुरते कोलमडले आहे. आधीच मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या तुलनेत लोकल फेऱ्या अपुऱ्या आहेत. त्यात विलंबामुळे प्रवाशांच्या हालात भर पडली आहे. अप आणि डाउन मार्गावर गर्दीची वेळ संपल्यानंतरही दररोज सरासरी किमान १० ते १५ मिनिटे लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाढीव फेऱ्या सुरू करण्यात असमर्थ
कल्याण-बदलापूरदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने या भागात गरज असूनही रेल्वे प्रशासन वाढीव फेऱ्या सुरू करण्यात असमर्थ आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांचा लोकल प्रवास अधिकाधिक जिकिरीचा होऊ लागला आहे. लोकल गाड्या विलंबाने धावत असल्याने गर्दीचे प्रमाणही वाढते आणि प्रवाशांना नियोजित वेळेत पोहोचता येत नाही.
आधीच मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्या अपुऱ्या आहेत. त्यात काही लोकल गाड्या एसी करण्यात आल्या आहेत. या एसी लोकलही दररोज उशिराने धावत असल्याने वेळापत्रक आणखी कोलमडत आहे.
स्थानिक कोंडी कारणीभूत
उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्यास कल्याण स्थानकातील कोंडी मुख्यत्वे कारणीभूत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कल्याण येथे अनेकदा लोकल खोळंबून राहतात. कल्याण स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल गाड्यांच्या वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी हाती घेण्यात आलेला कल्याण रिमॉडेलिंग प्रकल्प मार्च २०२७पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर कल्याणमधील वाहतूककोंडी सुटेल, अशी प्रवाशांना आशा आहे. मात्र, हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का, याबाबत प्रवाशांच्या मनात शंका आहे
लोकप्रतिनिधींनी समस्या मांडाव्यात
ज्याप्रकारे पश्चिम रेल्वेच्या समस्यांविषयी राम नाईक, मृणाल गोरे, गोविंदा या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला; संसदेत आणि रस्त्यावर उतरून प्रवाशांचे प्रश्न मांडले, तशाच प्रकारे मध्य रेल्वेच्या समस्यांविषयी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने आवाज उठवायला हवा. जोपर्यंत या समस्यांविषयी सातत्याने पाठपुरावा केला जात नाही, तोपर्यंत रेल्वे अधिकारी, बोर्ड आणि मंत्र्यांना प्रवाशांच्या समस्यांची जाणीव होणार नाही,असे अंबरनाथमधील प्रवासी प्रसाद पाठक यांनी सांगितले.
प्रवास अधिक जिकिरीचा
दूर अंतरावरून लोकलने मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास दिवसेंदिवस अधिकाधिक कष्टदायक होत आहे. उशिराने धावणाऱ्या गाड्या, प्लॅटफॉर्मवर तासनतास ट्रेनची वाट पाहणे, गर्दी, ढकलाढकली, त्यावरून होणारी भांडणे आणि उशिराने पोहोचल्याने कार्यालयीन कामावर होणारा परिणाम, या प्रवाशांच्या सर्वसाधारण व्यथा आहेत. लोकल सेवा वेळेत चालवा आणि अतिगर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त फेऱ्या सुरू करा, हीच आमची मागणी असल्याचे प्रवासी संघटना प्रतिनिधी अनुप सुरेश म्हेत्रे यांनी सांगितले.
