नवरात्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ८ ते २० ऑक्टोबर तसेच २५ व २६ ऑक्टोबर रोजी श्री सप्तशृंगगडावर खासगी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ एसटी बस व अत्यावश्यक वाहनांना परवानगी राहणार आहे.
श्री सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नाशिकचे अपर जिल्हा दंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. आदेशानुसार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २० ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत, तसेच २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नांदुरी ते सप्तशृंगगड घाटमार्गावर खासगी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध राहणार आहेत.
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाच्या कालावधीत राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नांदुरी ते सप्तशृंगगड हा घाटमार्ग अरुंद आणि वळणावळणाचा असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाल्यास वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. घाटमार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, तसेच अपघातांसारख्या अनुचित घटना टाळता याव्यात, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
…तर कारवाई
नाशिकचे अपर जिल्हा दंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि मोटार वाहन अधिनियम , १९८८ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
एसटी बस, अत्यावश्यक वाहनांना परवानगी
प्रशासनाच्या आदेशानुसार , निर्बंधांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस, ऑटोरिक्षा तसेच इतर आवश्यक प्रवासी वाहतूक वाहनांना नियमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सप्तशृंगगड बसेस धावणार अशोक स्तंभ मार्गे
नवरात्रोत्सवाला रविवारपासून (दि. ११) सुरुवात होणार असून, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे अडीचशे बसेस सप्तशृंग गडाकडे धावणार आहेत. मुंबईनाका परिसरात कालिका माता यात्रोत्सव सुरू होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या बसेस अशोकस्तंभ, रविवार कारंजा मार्गे सोडण्यात येतील.
शहर वाहतूक पोलिसांनी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. १९ सप्टेंबरपासून अनेक मार्गांवरील बसेस त्र्यंबकनाका – खडकाळी सिग्नल – सारडा सर्कल – मदिना चौक – मुंबईनाका – वडाळानाका – द्वारका मार्गे सोडण्यात येत होत्या. परंतु ,सप्तशृंग गडावरील यात्रेनिमित्त ९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान नवीन ठक्कर बस स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या या बसेस मेहेर सिग्नल – अशोकस्तंभ – रविवार कारंजा – पंचवटी कारंजा – दिंडोरी नाका मार्गे धावणार आहेत. सप्तशृंग गडाहून नाशिकमध्ये येणाऱ्या बसेसदेखील दिंडोरी नाका – पंचवटी कारंजा – रविवार कारंजा – सांगली बँक सिग्नल – शालिमार – खडकाळी सिग्नल – त्र्यंबकनाका मार्गे नवीन सीबीएस बस स्थानकात येतील, असे पोलिसांनी कळविले आहे.
