नवी मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीची टांगती तलावर;१६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपातीचे निर्देश

राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणीकपात करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे शहरात पुन्हा पाणीकपात लागू होण्याची शक्यता असून, याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

पाण्याची उपलब्धता आणि पुरवठ्याचा आढावा

महापालिकेच्या मोरबे धरणात सध्या सुमारे ९२ टक्के पाणीसाठा आहे. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पुढील वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना महापालिकेला खबरदारी घ्यावी लागत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाण्याची उपलब्धता आणि विविध घटकांना होणाऱ्या पुरवठ्याचा आढावा घेतला जात आहे.

पाणीपुरवठ्याचाही नव्याने आढावा

पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे नियोजन असून, अनावश्यक पाणीवापरावरही नियंत्रण आणले जाणार आहे. त्याचबरोबर सांडपाणी प्रक्रिया केंद्रे पूर्ण क्षमतेने चालवून प्रक्रिया केलेले पाणी बागा, बांधकामे, वाहन धुलाई यांसारख्या कामांसाठी वापरण्यावर भर दिला जाणार आहे. बांधकाम प्रकल्प, वाहन धुलाई केंद्रे आणि तरणतलावांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचाही नव्याने आढावा घेतला जात आहे.

नागरिकांची गैरसोय

शहरात सध्या नियमित पाणीपुरवठा सुरू असला तरी काही भागांत गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने किंवा अल्प वेळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. घणसोलीमधील सिम्पलेक्स वसाहतीत दिवसातून केवळ अर्धा तास पाणी येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. उंच इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर पाणी पोहोचत असले, तरी खालच्या मजल्यांवर पुरेसा दाब नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.

पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेची भूमिका

दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास आणि बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याची माहिती महापालिकेला मिळाली आहे. त्यामुळे बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे सक्तीचे करण्याचा पर्यायही विचाराधीन आहे. पुढील काळात पाण्याची उपलब्धता आणि मागणी यांचा ताळमेळ राखण्यासाठी नागरिकांनाही पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे लवकरच पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेची भूमिका आणिनियोजन स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

मोरबे धरणात ९२ टक्के पाणीपुरवठा

याआधी देखील नवी मुंबई मध्ये सोळा तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.पाऊस कमी आणि एल-निनोबाबत वर्तविण्यात आलेले अंदाज या सगळ्याचा परिणाम नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावर झाला. सध्या या धरणात ९२ टक्के पाणीसाठा असला तरी येणारी उष्णता आणि चालू असलेला ऑक्टोबर हिट ,पाणीटंचाई यांचा परिणाम नागरिकांवर होणार आहे.यामुळे पाण्याचे नियोजन करणे आणि गरज ओळखून पाण्याचा वापर करणे नागरिकांच्या हिताचे असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *