सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पवारांकडून पुरुषोत्तम जगतापांना दणका; राष्ट्रवादीतून तडकाफडकी हकालपट्टी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करणारे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मोठी कारवाई केली आहे. पक्षाची भूमिका डावलून निवडणुकीत स्वतंत्र वाटचाल केल्याने या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले .

यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कारखान्याच्या निवडणुकीत जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने अजित पवार गटाच्या अधिकृत पॅनलसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण तापले असून, पक्षानेही आता कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यावेळी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सध्या तीन पॅनल रिंगणात आहेत. त्यात जगताप यांनी स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून आव्हान दिल्याने निवडणुकीतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

तिरंगी लढत रंगणार

सोमश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि पुरुषोत्तम जगताप व भाजपचे माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील आघाडी एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपालाही धार आली आहे. “युगेंद्र पवार आणि आमच्या एका बैठकीत एकमेकांविरोधात बोलायचे नाही, असं ठरलं होतं. मात्र तरीही कारखाना ७० कोटी रुपयांच्या तोट्यात असल्याचा आरोप करण्यात आला. प्रत्यक्षात कारखाना दोन कोटी रुपयांनी नफ्यात आहे,” असा दावा जय पवार यांनी नुकताच कार्यकर्त्यांशी बोलताना केला आहे.

दरम्यान, कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात, काम करतात. त्यामुळे त्यांचेही ऐकले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे आम्ही पुढाकार घेतला नाही. त्याच दिवशी एकमेकांबद्दल बोलायचे नाही, असेही ठरले होते, असे जय पवार यांनी सांगितले. माळेगाव कारखाना ७० कोटी रुपयांच्या तोट्यात असल्याचे वक्तव्य पाहिल्यानंतर आपण संबंधितांना फोन करून माहिती घेतली. तसे काही घडले नसून कारखाना दोन कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उगीचच खोट्या अफवा सांगून आम्हाला निवडणूक लढवायची नाही, असे जय पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *