नवरात्रोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच, शहरातील केटरिंग व्यवसायात लगबग सुरू झाली असून, सोसायट्यांमधील गरबा-दांडिया, कार्यालयीन कार्यक्रम, घरगुती पूजा आणि इतर समारंभांसाठी विशेष पॅकेजची बुकिंग सुरू झाली आहे. १०० ते १५० जणांच्या पॅकेजपासून मोठ्या सोसायटी कार्यक्रमांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असून, नेहमीच्या जेवणासोबत उपवासाचे पदार्थ आणि फराळी मेन्यूला यंदा विशेष मागणी असल्याचे केटरर्स सांगतात.
स्वतंत्र फराळी मेन्यू
नवरात्रातील उपवास लक्षात घेऊन साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, भगर, राजगिरा, शिंगाड्याचे पदार्थ आणि बटाट्याच्या विविध पाककृतींचा समावेश असलेले स्वतंत्र फराळी मेन्यू तयार करण्यात येत आहेत. काही ठिकाणी नेहमीच्या शाकाहारी जेवणासोबत फराळी पदार्थ निवडण्याची सुविधाही देण्यात येत आहे.
‘नवरात्राच्या कार्यक्रमांचे नियोजन सुरू होताच केटरिंगसाठी चौकशी सुरू होते. यंदा सोसायटी आणि घरगुती कार्यक्रमांसाठी १०० ते १५० जणांच्या पॅकेजची मागणी असून, उपवासाच्या पदार्थांबाबतही ग्राहकांकडून विचारणा होत आहे,’ असे अंधेरीतील केटरर अमोल पाटील यांनी सांगितले.
नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणत साजरा
गेल्या काही वर्षांत सोसायट्यांमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असल्याने गरबा-दांडियासोबत सहभागींसाठी जेवणाची व्यवस्थाही केली जाते. जणांच्या संख्येनुसार केटरर्सकडून स्वतंत्र पॅकेज तयार करण्यात येत असून, त्यात भाजी, पोळी किंवा पुरी, भात, आमटी आणि गोड पदार्थांचा समावेश केला जात आहे.
घरगुती बुकिंगही भरगच्च
नवरात्रात घरगुती पूजा, भोंडला, हळदीकुंकू आणि इतर कार्यक्रमांसाठी कमी संख्येतील पाहुण्यांना पुरेल अशा पॅकेजचीही मागणी होत आहे. पाहुण्यांची संख्या आणि मेन्यूनुसार पॅकेज निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने आयोजकांना प्रत्येक पदार्थाची स्वतंत्र व्यवस्था करण्याऐवजी तयार पॅकेजचा पर्याय मिळत आहे. केटरर्सकडून विशेष मेन्यूची माहिती समाजमाध्यमे आणि प्रत्यक्ष संपर्कातून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे.
अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन आवश्यक
गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठीही अन्नसुरक्षेसंदर्भातील नियम लागू राहतील. वार्षिक सण-उत्सवांच्या काळात अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याबाबतचे वेळापत्रक देण्यात आले आहे. त्यानुसार सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले आहे.
